
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना *प्रशिक्षण काळात 11 हजार, प्रशिक्षणानंतर 15 हजारांचे टुल कीट, 5 टक्के व्याजदराने विनातारण 1 लाख
पारंपरिक, गुरु-शिष्य परंपरेने अथवा जात निहाय कुशल कारागीर आणि हस्तकलेच्या लोकांना नवी ओळख प्राप्त करुन देण्यासाठी, त्यांना सर्वांगिण आधार देऊन विकास करण्यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत सुतार, नाव तयार करणारे, शस्त्र तयार करणे, हतोडी व टुलकीट तयार करणारे, कुलुप तयार करणारे, मूर्तीकार/दगड कोरणारा, पाथरवट (दगडफोड्या), सोनार, कुंभार, चर्मकार/ पादत्राणे तयार करणारे, गवंडी (राजमिस्त्री), टोपली/चटई/झाडू तयार करणारे/काथ्या काम/विणकर/ बाहुली आणि खेळणी तयार करणारे (पारंपरिक), न्हावी, स्वयंरोजगार असणारे कारागीर आणि हस्तकला, हार तयार करणारे (माळकर), धोबी, शिंपी (पारंपरिक) आणि मासेमारी जाळे विणणारे हे या योजनेचे लाभार्थी आहेत. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे- लाभार्थ्याच्या आधारकार्डला जोडलेला मोबाईल क्रमांक, शिधापत्रिका, बँक पासबुक, पॅनकार्ड, कोणत्याही कॉमन फॅसिलिटी केंद्र अथवा आपले सरकार केंद्रामार्फत नोंदणी विनामुल्य करता येईल. लाभार्थ्यांना मिळणारा लाभ- कारागिरांना 7 दिवसीय प्रशिक्षण व त्यानंतर 15 दिवसीय प्रगत प्रशिक्षण, या प्रशिक्षण काळात दर दिवशी 500 रुपये विद्यावेतन मिळणार आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कारागिरांना 15 हजार किंमतीचे टुल कीट व्हाऊचर मिळणार आहे. विनातारण 1 लाख वार्षिक 5 टक्के व्याज दराने 18 महिन्यांसाठी व या कर्जाची परतफेड झाल्यानंतर पुन्हा 2 लाख वार्षिक 5 टक्के व्याज दराने 30 महिन्यासाठी राष्ट्रीयकृत सहकारी बँकेतून कर्ज मिळणार आहे. बँकांच्या व्याज दरातील फरक हा केंद्र शासन बँकांना भरपाई म्हणून देणार आहे. त्याचबरोबर लाभार्थ्यांना भविष्यात कामाची, विम्याची हमी आणि तसेच मार्केटींगसाठी मदत करण्यात येणार आहे. वरीलप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करुन या योजनेचा अधिकाधिक लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, कुळकर्णी कंपाऊंड जेल रोड,बीएसएनएल ऑफीस जवळ, रत्नागिरी 02352-222379 dvioratna@rediffmail.com वर संपर्क करावा. *- प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते* *जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी*000