
गोहत्या विरोधातील आंदोलन प्रकरणी दाखल खटल्यात आमदार निलेश राणे, माजी आमदार बाळ माने, माजी जिल्हा अध्यक्ष सचिन वहाळकर, सकल हिंदू समाजाचे चंद्रकांत राऊळ यांच्यासह एकूण २८ संशयितांची निर्दोष मुक्तता
गेल्या वर्षी रत्नागिरी येथे झालेल्या गोहत्या विरोधातील आंदोलन प्रकरणी दाखल खटल्यात आमदार निलेश राणे, माजी आमदार बाळ माने, माजी जिल्हा अध्यक्ष सचिन वहाळकर, सकल हिंदू समाजाचे चंद्रकांत राऊळ यांच्यासह एकूण २८ संशयितांना न्यायालयाने निर्दोष मुक्तता दिली आहे. शासनाने हा खटला मागे घेतल्याने न्यायालयाने निकाल देत सर्व आरोपींना मुक्त केले.
गेल्या वर्षी एमआयडीसी परिसरात वासराची मान कापलेली आढळल्याने रत्नागिरी जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणात कोणतीही तातडीची कारवाई न झाल्याने सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते.
त्यानंतर आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीतील मुख्य मार्गावर रस्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. “आरोपींना अटक होईपर्यंत आंदोलन सुरू राहील,” अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्याने जवळपास चार तास मुख्य मार्ग ठप्प झाला होता. अखेर पोलिसांनी संशयितांना अटक करून न्यायालयात चार्जशीट दाखल केली होती.
या प्रकरणी पोलिसांनी एकूण २८ जणांवर गुन्हे दाखल केले. मात्र, राज्य शासनाच्या सर्क्युलरनुसार ज्या आंदोलनांमध्ये मारहाण किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही, अशा गुन्हे मागे घेण्याचे धोरण असल्याने हा खटला सरकारने मागे घेतला. परिणामी न्यायालयाने सर्व संशयितांची निर्दोष मुक्तता केली
या खटल्यात आरोपींच्या वतीने ॲड. निनाद शिंदे, ॲड. चाचले, ॲड. थरवळ आणि ॲड. भाऊ शेट्ये यांनी काम पाहिले.




