
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची “विदेशी मद्यविरोधी कारवाई. कोर्ले बौद्धवाडी फाटा (ता. लांजा) येथे गोवा बनावटीचे मद्य जप्त.
रत्नागिरी : विदेशी मद्य प्रतिबंध व कारवाई करण्याच्या अनुषंगाने लांजा तालुक्यातील कोर्ले बौद्धवाडी फाटा येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या गस्त घालणाऱ्या पथकाने सापळा रचून गोवा बनावटीचे विदेशी मद्यासह चारचाकी गाडी अशी एकूण २२ लाख २१ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. याप्रकरणी राजीव अंबाजी सावंत (रा. सावंतवाडी सिंधुदुर्ग) आणि प्रभू साबना कामनेती (रा. सावंतवाडी, सिंधुदुर्ग) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये विदेशी मद्य प्रतिबंध व कारवाई करण्याचे अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सूचना देण्यात आल्या आहेत.
त्याप्रमाणे रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार हे लांजा शहरात ३ मे गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की काही इसम गोवा बनावटीची विदेशी दारू घेऊन विक्री करण्याचे उद्देशाने येत आहेत.मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कोर्ले बौद्धवाडी फाटा, लांजा येथे सापळा रचून एक हुंडाई कार (MH07-AB-1847) ही संशयितरित्या जाताना आढळून आल्याने त्या वाहनाला थांबविण्यात आले. त्यातील इसम हा संशयित हालचाली करीत असताना दिसून आला. त्याचा या पथकास संशय आल्याने त्यांच्या ताब्यातील वाहनामधील साहित्याची दोन पंचांसमक्ष चौकशी केली असता त्यांचे ताब्यात विविध कंपनीच्या गोवा बनावटीच्या विदेशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या.
या वाहनामधील राजीव अंबाजी सावंत आणि प्रभू साबना कामनेती पंचांसमक्ष वाहनासह ताब्यात घेऊन २२ लाख, २१ हजार ४४० किंमतीच्या मुद्देमाल जप्त करून आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईसाठी लांजा पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आलेला आहे. तसेच या गुन्ह्याचा अधिक तपास लांजा पोलीस ठाणे करीत आहे.ही कामगिरी पोलीस अधीक्षक, रत्नागिरी व अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. ढेरे व तानी गुन्हे अन्वेषण शाखेचे स.पो.फौ. सुभाष भागणे, पो.हवा प्रवीण खांबे, पो.हवा गणेश सावंत, पो.हवा अमित कदम, पो.हवा विक्रम पाटील, पो.हवा विजय अंबेकर, पो.हवा सत्यजित दरेकर, चा.पो.शी/अतुल कांबळे यांनी पार पाडली.