
वातावरणातील बदलामुळे मच्छी व्यवसाय संकटात असतानाच आता मच्छी व्यवसायिकां समोर खलाशांच्या रूपाने नवे संकट
पर्ससीन नेट मासेमारी सुरू होऊन अद्याप महिनाही उलटलेला नाही, तोपर्यंत खलाशांनी आपल्या गावाकडे पलायन केले आहे. दिवसेंदिवस पलायनाच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे नौकामालकांना मोठा फटका बसल्याने ते आता नव्या संकटात सापडले आहेत.पळून जाणाऱ्या खलाशांमध्ये नेपाळी खलाशांची संख्या अधिक आहे.
पर्ससीन नेटने मासेमारी केल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असली तरी त्यासाठी लागणाऱ्या खलाशांसाठी नौकामालकांना पायपीट करावी लागते. त्यासाठी काम करणाऱ्या स्थानिक खलाशांची संख्या कमी पडते. म्हणून नौका मालक कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल वा अन्य राज्यांतून खलाशी आणतात. आता नेपाळी खलाशीही अनेक नौकांवर काम करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
हे खलाशी आणण्यासाठी नौका मालकांना परराज्यात फेऱ्या माराव्या लागतात. अनेकदा हजारो रुपये ॲडव्हान्स दिले जातात. ही रक्कम घेऊनही काही महिने काम करून खलाशी पळून जातात. त्यामुळे नौकामालकांचे आर्थिक नुकसान होते. शिवाय खलाशांची संख्या कमी झाल्याने त्यांना स्वत:ला समुद्रात इतर खलाशांप्रमाणे जावे लागते.




