
मिरकरवाडा जेटीवर अडथळे आणणार्या मासळी विक्रेत्यांची मार्केट शेडमध्ये रवानगी
मिरकरवाडा जेटीवर अडथळा करणार्या मासळी विक्रेत्यांना नोटीस बजावून ते लाखो रुपये खर्चून बांधलेल्या शेडमध्ये बसण्यास तयार नव्हते. त्यामुळे या मासळी विक्रेत्यांना मत्स्य विभागाने पोलीस, कस्टमच्या मदतीने हटवण्याची कारवाई करत विक्रेत्यांना मच्छिमार्केटच्या शेडमध्ये बसवण्यात आले. पण त्या शेडमधील बसण्याच्या जागेवरून विक्रेत्या महिलांमधील २ गटांमुळे नवा वाद निर्माण झाल्याने बसण्याच्या जागेसाठी लॉटरी पद्धत कार्यवाही व्हावी, अशी एका गटाची मागणी आहे.नव्या मच्छिमार्केटमध्ये बसण्यासाठी काही मासळी विक्रेत्या महिलांनी प्रवेशद्वाराजवळ बसण्यास पसंती दर्शविली आहे. त्यामुळे हा वाद चव्हाट्यावर आला आहे. प्रवेशद्वाराजवळ कोण बसणार, यावरून हा वाद सुरू झाला आहे. चिठ्ठी काढून हा वाद सोडवण्याचा विषय उद्योजक किरण सामंत यांच्याकडे गेला आहे. त्यामुळे या विषयात लवकरच योग्य तोडगा निघणार असल्याचे बोलले जात आहे. जेटीवर मांसविक्री करणार्या विक्रेत्यांची चांगली सोय व्हावी यासाठी मत्स्य विभागामार्फत १ कोटी रुपये खर्च करून मच्छिमार्केट बांधण्यात आले आहे. त्या नव्या मार्केटमध्ये चांगली व्यवस्था करूनही विक्रेत्या महिलांचे जेटीवर अतिक्रमण वाढले होते. त्यामुळे जेटीवर वाहतूककोंडीही होत होती. यापूर्वी मत्स्य विभागाने अतिक्रमण हटवून जेटीवरील १५ फूटाची जागा रिकामी ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. काही विक्रेते मार्केटमध्ये बसण्यास गेले तर काही विक्रेत्यांनी जेटीवरच आपले बस्तान मांडले होते. त्यांना हटविण्यासाठी मत्स्य विभागाने रिक्षा फिरवून ध्वनीक्षेपकावरून कारवाईचा इशारा दिला होता. तरीही जेटीवरून मासळी विक्रेत्या महिला हटत नसल्याने बुधवारी मत्स्य विभागाने पोलीस व कस्टमची मदत घेवून त्या विक्रेत्यांना जेटीवरून हटवले. www.konkantoday.com