
दिल्ली येथे धरणे आंदोलनात अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या रत्नागिरीतील पदाधिकाऱ्यांचा सहभाग
रत्नागिरी : दिल्लीतील ऐतिहासिक जंतर-मंतर येथे सुरू झालेल्या लक्षवेधी धरणे आंदोलनात देशभरातील हजारो शिक्षक सहभागी झाले. या आंदोलनात शिक्षकांना सहभागी होण्याचे आवाहन अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने केले होते. त्यानुसार रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष दिलीप देवळेकर, जिल्हा सरचिटणीस भालचंद्र घुले, राज्य संयुक्त चिटणीस प्रवीण काटकर, जिल्हा नेते रमाकांत शिगवण, जिल्हा उपाध्यक्ष अजय उपरे, तालुकाध्यक्ष विजय फंड संघटनेचे दत्तात्रय तोटावर, अजित कांबळे व इतर अनेक सदस्य उपस्थित होते.
आंदोलनामध्ये देशभरातील २८ संघराज्यातून शिक्षक उपस्थित होते. यावेळी विविध राज्यातील शिक्षक आमदार- खासदार यांनी आंदोलनास उपस्थित राहून मार्गदर्शन केले. टीईटी अनिवार्य निर्णय रद्द करण्यासाठी सभागृहात विषय घेऊन न्याय देण्याचे आश्वासन दिले.
आंदोलनानंतर भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना निवेदन देण्यात आले. या मागण्यांचा विचार न केल्यास फेब्रुवारीमध्ये संसदेच्या अर्थासंकल्पीय अधिवेनावेळी दिल्ली येथील रामलीला मैदानावर आक्रोश मोर्चा व संसदेला घेराव घालण्याचा इशारा अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघातर्फे देण्यात आला आहे, असे जिल्हाध्यक्ष दिलीप देवळेकर यांनी सांगितले.
नियुक्तीनंतर पात्रता परीक्षा शासनाच्या कर्मचाऱ्यांना लागू नाही. फक्त शिक्षकांना का? टीईटी पत्र असणाऱ्या शिक्षकांना पेन्शन नाही. व ज्यांना पेन्शन आहे त्यांनी टीईटीद्या नाहीतर नोकरीतून बाहेर जा, या शासनाच्या परस्पर विरोधी भूमिकेचा जाहीर निषेध करण्यात आला, असेही अखिल भारतीय शिक्षक संघ रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष श्री. देवळेकर यांनी सांगितले.




