
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या श्री गजानन महाराज प्रकट दिन सायकल रॅलीला प्रतिसाद
रत्नागिरी : जय गजानन, श्री गजानन, भारत माता की जय अशा घोषणा देत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने रविवारी सकाळी गजानन महाराज प्रकट दिन विशेष सायकल रॅली काढली. नाचणे पॉवरहॉऊस येथील श्री गजानन महाराज मंदिरापासून रॅली सुरू झाली आणि गोळप येथील श्री गजानन महाराज मंदिरात रॅलीची सांगता झाली. या फेरीत ४० हून अधिक सायकलस्वारांनी भाग घेतला.रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने प्रथमच श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त सायकल रॅली काढली. यापूर्वी विविध विषयांकरिता क्लबने यशस्वी रॅली आयोजित केल्याने आजच्या रॅलीचेही सुरेख नियोजन करण्यात आले. रॅलीला नाचणे येथील मंदिरातून सकाळी ६.१५ ला सुरवात झाली. श्री गजानन नामघोष करत ही फेरी निघाली. ही रॅली जयस्तंभ येथे पोहोचल्यानंतर आणखी सायकलिस्ट या रॅलीत सहभागी झाले. भाट्ये, कसोप फाटा, वायंगणी फाटा, जोशी कंपाऊंड, कोळंबे फाटा, फिनोलेक्स फाटा या मार्गावरून ही रॅली साडेसात वाजता श्री गजानन महाराज मंदिरात पोहोचली. रॅलीमध्ये रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य असणारे डॉक्टर, वकिल, अभियंते, पत्रकार, इयत्ता चौथीपासूनचे विद्यार्थी, महिला, प्राध्यापिका आदी उत्साहाने सहभागी झाले होते. श्री गजानन महाराजांचे दर्शन घेऊन सर्व सायकलिस्ट आनंदित झाले.गोळप येथील श्री गजानन महाराज मंदिरात प्रकट दिन सोहळा अत्यंत सुरेख पद्धतीने साजरा होतो. मंदिराच्या आवारात मंडप, मागील बाजूला महाप्रसादाची चोख व्यवस्था केली होती. मंदिराचे विश्वस्त माधव गोगटे यांनी सर्व सायकलिस्टचे स्वागत केले. तसेच दरवर्षी अशी रॅली काढावी, असे आवाहन केले. मंदिर समितीने येथे सायकलिस्टची नाश्त्याची व्यवस्थाही केली. मंदिराला अनेक भक्तांकडून मदत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.www.konkantoday.com