
पावसाळयात आरोग्य सुविधा अबाधित राहणे आवश्यक-उदय सामंत
पावसाळा आठवडाभरात सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी सर्व आरोग्य केंद्र सुस्थितीत राहतील याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती कक्षात पावसाळापूर्व आपत्ती आढावा बैठकीत ते बोलत होते.पावसाळ्याच्या पार्श्वषभूमीवर आरोग्य, रस्ते सुविधा, अन्नधान्य आणि इतर बाबींचा सविस्तर आढावा त्यांनी या बैठकीत घेतला. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत सर्व तालुक्यातील अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सीग च्या माध्यमातून सहभागी झाले होते. या बैठकीत नगराध्यक्ष बंड्या साळवी तसेच आरोग्य सभापती बाबू म्हाप आदींची उपस्थिती होती.
लांजा आणि राजापूरमध्ये पावसामुळे पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. त्यात आरोग्य केंद्रांचे काम बाधित होण्याची शक्यता आहे. त्यासाठी लगेच देखभाल दुरुस्तीचे काम पूर्ण करावे, असे सामंत म्हणाले.
नगरपालिका रुग्णालयाचे काम चार दिवसात सुरू होणे आवश्यक आहे. सोबतच महिला रुग्णालय कार्यान्वित झाल्यास पावसाळ्याच्या काळात अधिक चांगल्या प्रकारे आरोग्यसेवा देणे शक्यर होणार आहे. सोबत कोरोनाच्या उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पूर्ण व्यवस्था आहे. क्रांतीनगर आणि मजगाव येथील रुग्णालयांमध्ये 60 खाटांची सोय झाल्यास इतर आजारांच्या रुग्णांवरही व्यवस्थित उपचार होतील, असे त्यांनी यावेळी सांगितले
रस्ते पूल
पावसाळ्यात सर्व रस्ते आणि घाट सुरळीत राहणे आवश्यक आहे. दरडी कोसळण्याची शक्यता असणाऱ्या ठिकाणी रस्ते सुरक्षा महत्त्वाची आहे. तसेच या ठिकाणी रस्तेवाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक यंत्रे आधीच तयारी करण्यात येईल, असे या बैठकीत सांगण्यात आले.
गणपतीपूर्वी सर्व महामार्गांवरील खड्डे बुजवले जातील व संपूर्ण महामार्ग वाहतूक सुरळीत राहील याची खबरदारी घेण्यात यावी, अशी सूचना सामंत यांनी या बैठकीत केली.
डिस्टन्सींगचे पालन
जिल्ह्यांतर्गत वाहतुकीसाठी बसचा वापर सुरू झाला आहे. covid-१९ च्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सींग पाळण्यासाठी केवळ 22 प्रवासी एक बस मध्ये बसविण्याची परवानगी आहे. मात्र प्रत्यक्षात बसमध्ये प्रवासी त्याचे पालन करीत नाहीत, असे दिसून आले आहे. यापुढील काळात त्याचे काटेकोरपणे पालन होईल याची खबरदारी वाहकांनी घ्यावा हक्काने घ्यावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. परिवहन विभागाने लॉकडाऊन दरम्यान जप्त केलेली वाहने एसटी आगारात ठेवली आहेत. ही वाहने त्वरित सोडण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
पावसाळ्यात होणारा शिधा धान्याचा पुरवठा वेळेत होईल. यासह भोजन थाळी वाटपात सर्व केंद्रात समानता आवश्यक आहे असेही ते म्हणाले.