
अनेक प्रवाशांचाश्वास गुदमरला, चक्कर येऊ लागली, विमानातून रेस्क्यू करतात तशी मोनोरेल प्रवाशांची सुटका
मुंबईत पावसाने धुमशान सुरु असतानाच लोकल आणि बेस्ट सेवा ठप्प झाली असतानाच पर्याय म्हणून मोनोरेलकडे प्रवासी वळले असतानाच तिने दगा दिला. मोनोरेलचा एक रेक म्हैसूल कॉलनी स्थानका दरम्यान मंगळवारी अडकला.तास ते दीड तासापासून मोनोरेल एकाच जागी अडकून पडली. एसी बंद आणि आत अडकलेले प्रवासी घुसमटू लागल्याने अखेर अग्निशमन दलाने या प्रवाशांची सुटका करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एका एका प्रवाशाला क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले.
मोनोरेल सायंकाळी ६.१५ वाजताच्या दरम्यान चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान अचानक बंद पडली. प्रवाशांनी आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या क्रमांकावर संपर्क साधला. त्याची तातडीने दखल घेत मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आणि तीन स्नोर्केल वाहनांच्या साहाय्याने मदत कार्य सुरु केले. यावेळी प्रवाशांना मोनोरेलच्या आतील वातानुकूलित यंत्रणाही बंद पडल्याने गुदमरल्यासारखे झाले. पालिकेच्या आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी स्नोर्केल वाहने आणि शिडीचा वापर करुन प्रवाशाची एकेक करुन सुटका केली. या प्रवाशांना प्रथमोपचार करण्यासाठी पालीकेचे वैद्यकीय पथकही घटना स्थळी हजर होते.
बाका प्रसंग ओढवला
मोनोरेलच्या निर्मितीनंतर अनेकदा अशा प्रकारे नादुरुस्त मोनोरेलचे रेक वापरात असल्याने या मोनोरेल वारंवार बिघडत असतात. त्यावेळी दुसरी मोनोरेल मागवून ढकळत या मोनोरेलला स्थानकात नेले जाते. यावेळी या मोनोरेलचा विद्युत पुरवठाच बंद पडल्याने अशा बाका प्रसंग ओढवला. एमएमआरडीए अशा घटनागृहीत धरुन आधीच प्रवाशांची सुटका जलदगतीने कशी होईल यासाठी काही तरी पर्याय काढायला हवा होता अशी टीका आता होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत