
जागेचे पैसे न मिळाल्याने वृद्धाची आत्महत्या — दोन संशयितांना अटक
*दापोली तालुक्यातील हर्णै-राजवाडी येथे राहणारे जयंत दुबळे (वय ८०) या वृद्धाने जागा विक्रीचे ४० लाख रुपये न मिळाल्याच्या मनस्तापातून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना ४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३० ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास जयंत दुबळे हे आपल्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत आढळले. सुरुवातीला ही घटना आत्महत्येची म्हणून नोंदवण्यात आली होती. मात्र, पुढील तपासादरम्यान पोलिसांना मृत दुबळे यांनी लिहिलेली एक चिठ्ठी (सुसाईड नोट) सापडली.
त्या चिठ्ठीत त्यांनी संदेश शंकर कदम आणि अमोल भालचंद्र गुरव या दोघांनी जागेच्या विक्रीतील उर्वरित ४० लाख रुपये दिले नाहीत, त्यामुळे स्वतःला फसवणूक झाल्याची भावना होऊन आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे.
या घटनेनंतर अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची दिशा ठरवली. या प्रकरणी दापोली पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक केली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
………………………




