
ओझरे खुर्द येथील तरुणाचा खून करणाऱ्या आंबवमधील आरोपीला जन्मठेप; काजूच्या पैशाच्या व्यवहारातून कोयतीने केले होते वार
रत्नागिरी : काजू बियांच्या पैशाच्या वाटणीतून मित्रावर कोयतीने वार करून खून करणार्या आंबव येथील आरोपीला न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. संतोष शंकर धाटे (वय 44, राहणार आंबव कोंडकदमराव कातळवाडी संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अॅड. वर्षा प्रभू यांनी काम पाहून 13 साक्षीदार तपासले. तसेच पैरवी अधिकारी म्हणून पोलिस नाईक सागर उगळे यांनी काम पाहिले.
संगमेश्वर तालुक्यातील आंबव कातळवाडी येथे ही खुनाची घटना 5 जून 2020 रोजी घडली होती. संदीप विठ्ठल केदारी (वय 43, राहणार ओझरे खुर्द, गवळीवाडी संगमेश्वर) याचा खून झाला होता. या खुनानंतर प्रकाश तुकाराम पांचाळ (वय 54, राहणार आंबव सुतारवाडी, संगमेश्वर) यांनी देवरूख पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. काजू बियांच्या पैशांच्या वाटणीतून संतोषच्या अंगणात भांडण झाले. यावेळी लोखंडी कोयतीने संतोषने संदीपवर वार करून त्याचा खून केला. याप्रकरणी देवरूख पोलिस ठाण्यात संतोषवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक तुषार पाचपुते यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. गुरुवारी या खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने संतोषला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.