
रवींद्रनाथांचे अनोखे म्युरल न्यायालयाच्या इमारतीत साकारणार
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते गुरूवर्य रवींद्रनाथ टागोर यांचे रत्नागिरीशीही नाते आहे. त्यांचे बंधू रत्नागिरी जिल्हा न्यायाधीश असताना रवींद्रनाथ रत्नागिरीत काही काळ वास्तव्यास होते.त्यामुळेच त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी रवींद्रनाथांचे अनोखे म्युरल न्यायालयाच्या इमारतीत साकारण्यात येत आहे.
म्युरलचे काम कोल्हापूरचे आर्टिस्ट किशोर पुरेकर पूर्ण करत आहेत. म्युरलच्या जागेवरील बांधकाम एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर वीणा पुजारी यांच्यामार्फत सुरू झाले आहे. १९१३ ला साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळवणारे गुरूवर्य रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतनची स्थापना केली. जगातल्या अत्यंत ज्येष्ठ कवींमध्ये रवींद्रनाथांची गणना होते. निसर्ग हा त्यांच्या काव्याचा आत्मा होता. जन-गण-मन या राष्ट्रगीताचे निर्माते रवींद्रनाथांसारखे विश्वबंधू विभूतीच्या वास्तव्याने पुनित झालेल्या न्यायालयातील परिसराचा वारसा आपण श्रद्धेने जपला पाहिजे, असे सर्वांच्या मनात आहे.
जन-गण-मन या भारताच्या तर आमार शोनार बांगला या बांगलादेशाच्या अशा या दोन्ही राष्ट्र गीतांचे जनक रवींद्रनाथ टागोर होत. एवढेच नव्हे तर श्रीलंकेचे राष्ट्रगीत त्यांच्याच साहित्य प्रेरणेतून घेतले आहे. न्यायालयाच्या परिसरात रवींद्रनाथांच्या काव्यपंक्तींचे भिंतीचित्र (म्युरल) व त्या अनुषंगाने सुशोभीकरण अशी स्मृतिशिल्पाची कल्पना आहे.
www.konkantoday.com