
टक्केबाज दूर झाले, आता विकासकामे दर्जेदार होतील : खा. विनायक राऊत
संगमेश्वर : माखजन विभागात आता पक्ष वाढीसाठी पोषक वातावरण आहे. टक्केबाज दूर झाल्याने ग्रामस्थांना दर्जेदार विकासकामे अनुभवता येतील, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी माखजन विभागातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बुरंबाड येथे केले.
खा. राऊत यांनी माखजन विभागाचा दौरा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी खा. राऊत म्हणाले की, दोन-चार कार्यकर्ते पक्ष सोडून गेले तर संघटनेवर त्याचा काहीच फरक पडत नाही. जे पक्ष सोडून गेले आहेत त्यांनी त्यांच्यासोबत किती कार्यकर्ते आहेत, त्याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. यावेळी खा. राऊत यांनी बुरंबाड सरपंच नम्रता कवळकर यांची प्रशंसा करत बुरंबाडच्या विकासाला गती देणारा कारभार असल्याचे सांगितले.
शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, सुभाष नलावडे, नेहा माने, वेदा फडके आदींनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. दिलीप सावंत, शंकर भुवड, अनिल मोरे, अनंत गुरव, बावा चव्हाण, सतीश कुंभार, संजय शिंदे, तुकाराम मेस्त्री, प्रशांत विचारे, सचिन चव्हाण, बाबू मोरे आदींसह सेना कार्यकर्ते उपस्थित होते. परमेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. खासदार विनायक राऊत यांनी सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले.