
क्रीडाशिक्षक नसल्यास शाळांची मान्यता रद्द करणार : माणिकराव कोकाटे
राज्यात यापुढे अल्पसंख्याक शाळांमध्ये क्रीडाशिक्षक असणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, ज्या शाळांमध्ये क्रीडाशिक्षक नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल, असा इशारा क्रीडा व युवक कल्याणमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
देशात 65 टक्के तरुणवर्ग असून, तरुणांना खेळात प्रोत्साहित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरावर क्रीडा संकुल उभारण्यात येणार असून, क्रीडा संकुल शाळा व महाविद्यालये यांच्याशी जोडण्यात येणार आहेत, असेही मंत्री कोकाटे यांनी सांगितले. मात्र काही शाळांमध्ये क्रीडा शिक्षक नसल्याचे निदर्शनास आले आहे, असे ते म्हणाले. मुंबईत खेळासाठी वक्फ बोर्डाच्या जागा उपलब्ध करण्यात येतील, तसेच आपल्या खेळाडूंना प्रशिक्षणासाठी कतार येथे खेळाची मैदाने उपलब्ध करून दिली जाणार असून, त्यासाठी कतारसोबत करार करण्यात येणार असल्याचेही मंत्री कोकाटे यांनी सांगितले.




