
महाविकास आघाडीबरोबर जाणार का? राज ठाकरे म्हणाले…
- महाविकास आघाडीचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी व मंगळवारी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम व निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. त्यानंतर सर्व नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदही घेतली. निवडणूक अधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकीवेळी राज ठाकरे व मविआ नेत्यांनी मतदार याद्यांमधील घोळाचा मुद्दा उपस्थित केला. राज ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्याना सुचवलं की मतदार याद्या तातडीने दुरुस्त करा. याद्यांमधील चुका दुरुस्त झाल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या. त्यासाठी सहा महिने गेले तरी चालतील. आवश्यकता असल्यास स्थानिक निवडणुका सहा महिने पुढे ढकला.
दरम्यान, निवडणूक अधिकाऱ्यांची भेट व या संयुक्त पत्रकार परिषदेच्या निमित्ताने राज ठाकरे पहिल्यांदाच महाविकास आघाडीबरोबर दिसले. तसेच गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. कधी ते खासगी कार्यक्रमात तर कधी सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसत आहेत. मराठीच्या मुद्दयावरही राज व उद्धव ठाकरे एकत्र आल्याचं सर्वांनी पाहिलं.
या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी, प्रामुख्याने मुंबई महानगरपालिकेसाठी महाविकास आघाडीत सहभागी होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मी यापूर्वी देखील मविआबरोबर होतो : राज ठाकरे
राज ठाकरे म्हमाले, “मी यापूर्वी देखील महाविकास आघाडीबरोबर दिसलो होतो. मी २०१७ मध्ये देखील विरोधी पक्षांच्या आघाडीबरोबर दिसलो होतो आणि तेव्हादेखील मतदार याद्यांच्या घोळावरून प्रश्न उपस्थित केले होते. दरम्यान, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, “आम्ही सर्वच पक्षांना बोलावलं होतं.”
राज ठाकरेंचा अजित पवारांना चिमटा
राज ठाकरे म्हणाले, “सध्या मतदार याद्यांचा विषय महत्त्वाचा आहे. आता निवडणुका होणार का, निवडणुका होणार असतील तर कशा होणार हे महत्त्वाचं आहे. निवडणूक कोणाबरोबर होणार हा आत्ताचा विषय नाही. २०१७ च्या पत्रकार परिषदेत मी मविआ नेत्यांबरोबर होतो. विशेष म्हणजे त्यावेळी आमच्याबरोबर या मंचावर उपमुख्यमंत्री अजित पवारही होते. आज त्यांनी देखील आमच्याबरोबर यायला हवं होतं. कारण ते त्यावेळी तावातावाने बोलत होते, मुद्दे मांडत होते.”




