
महाबोधी विहारासाठी रिपाइं गट एकवटले
आझाद मैदानात आज सर्वपक्षीय मोर्चा
बिहारमधील बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांचे असून त्याचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्धांचे असले पाहिजे, या मागणीसाठी वंचित वगळता राज्यातील इतर सर्व रिपाइं गट, राजकीय पक्ष आपले मतभेद विसरून एकत्र आले असून आज (१४ ऑक्टोबर) आझाद मैदानात मोर्चा काढला जाणार आहे. रिपाइं गट प्रथमच एकवटल्याने आझाद मैदानात निघणाऱ्या मोर्चाच्या माध्यमातून मोठे शक्तिप्रदर्शन होणार आहे.
महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा, या मागणीसाठी आझाद मैदानावर विराट मोर्चा होणार आहे. त्यामध्ये सर्व रिपब्लिकन गट, बौद्ध आंबेडकरी संघटना यांच्यासह महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते सहभागी होणार आहे. या आंदोलनाची माहिती देण्यासाठी नुकतीच मुंबई येथे मराठी पत्रकार संघात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. राजेंद्र गवई, नानासाहेब इंदिसे, खासदार वर्षा गायकवाड, चंद्रकांत हंडोरे, आमदार संजय बनसोडे यांच्यासह विविध पक्षांचे अनेक नेते, विविध रिपब्लिकन गटांचे नेते उपस्थित होते. या मोर्चात प्रचंड संख्येने सर्व बौद्ध, आंबेडकरी जनतेने ताकदीने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविहार मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक रामदास आठवले यांनी केले आहे.
आंदोलन कृती समितीचे सदस्य :
खासदार रामदास आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. राजेंद्र गवई, नानासाहेब इंदिसे, ॲड. सुरेश माने, चंद्रबोधी पाटील, दीपक निकाळजे, अर्जुन डांगळे, सुलेखा कुंभारे, काँग्रेसचे नितीन राऊत, चंद्रकांत हंडोरे, खासदार वर्षा गायकवाड, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, राजू वाघमारे, आमदार राजकुमार बडोले, संजय बनसोडे, राम पंडागळे, भाई गिरकर हे या महाविहार मुक्ती आंदोलन कृती समितीचे सदस्य आहेत.




