
कुडाळ शहरात एका रिक्षाचालकाकडून युवतीसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार
कुडाळ शहरात एका रिक्षाचालकाकडून युवतीसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी त्या अज्ञात रिक्षाचालकाचा शोध सुरू केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.ही युवती कुडाळ शहरातील एका खासगी रुग्णालयात कामाला आहे. सायंकाळी काम संपवून ती घरी परतत असताना एका अनोळखी रिक्षाचालकाने तिच्यासमोर रिक्षा थांबवली. काही समजायच्या आत त्या रिक्षाचालकाने युवतीचा हात पकडून तिला जबरदस्तीने रिक्षामध्ये खेचण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे युवती क्षणभर घाबरली, मात्र तिने प्रसंगावधान राखत आरडाओरडा केला.तिच्या आरडाओरड्याने आसपासचे लोक त्या ठिकाणी जमा होऊ लागल्याचे पाहून रिक्षाचालकाने ताबडतोब रिक्षासह पळ काढला. या दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रिक्षा स्पष्टपणे दिसत असली तरी चालकाचा चेहरा नीट ओळखता येत नसल्याने पोलिसांना तपासात अडचणी येत आहेत. पोलिसांकडून याचा कसून शोध सुरू असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.



