
राजापूरात पुन्हा मोटरसायकल चोरी – कोंडेतढ भंडारवाडीतील घटनेने परिसरात खळबळ
राजापूर तालुक्यातील कोंडेतढ भंडारवाडी येथे चोरीची आणखी एक घटना घडली आहे. दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी, मध्यरात्री साधारणतः 1 वाजण्याच्या सुमारास, संजय नाना कुवेस्कर यांच्या घराच्या अंगणाबाहेर उभी असलेली स्प्लेंडर मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अलीकडच्या काळात राजापूर शहर व परिसरात चोरीच्या घटना वाढत असून, नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरली आहे.
चोरट्यांनी शांत परिसरातील घराजवळूनच मोटरसायकल उचलून नेल्याने पोलिसांपुढे आव्हान उभे राहिले आहे. घटनेनंतर राजापूर पोलिसांनी तपास सुरू केला असून, चोरांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
स्थानिक नागरिकांनी पोलिस प्रशासनाने गस्त वाढवावी आणि परिसरातील सीसीटीव्ही तपासावेत, अशी मागणी केली आहे.




