शुबमन गिलने मोडला हिटमॅनचा रेकॉर्ड! असा पराक्रम करणारा ठरला पहिलाच फलंदाज!

भारत आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला आहे. भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी ५ गडी बाद ५१८ धावा करत पहिला डाव घोषित केला आहे. भारतीय संघाकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन आणि कर्णधार शुबमन गिलने दमदार शतकी खेळी केली. यशस्वी जैस्वाल १७५ धावांवर माघारी परतला. तर गिलने देखील आपल्या कसोटी कारकिर्दीतील १० वे शतक पूर्ण केले. यासह त्याने मोठा विक्रम मोडून काढला आहे.

रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर कसोटी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. नेतृत्वाच्या दबावामुळे फलंदाजांची कामगिरी खालावते. पण गिलकडे जेव्हापासून ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तेव्हापासून त्याच्या फलंदाजीचा स्तर आणखी उंचावला आहे. इंग्लंड दौऱ्यावर फलंदाजी करताना त्याने ७५० हून अधिक धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने ४ शतकं झळकावले होते. आता वेस्टइंडिजविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत त्याने दमदार शतक झळकावलं आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत मोठ्या विक्रमाला गवसणी

शुबमन गिलचे कर्णधार म्हणून ५ वे आणि भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये झळकावलेले १० वे शतक ठरले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत हे त्याचे १० वे शतक आहे. यासह तो भारतीय संघाकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारा फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम भारताची माजी कर्णधार रोहित शर्माच्या नावावर होता. रोहितने या स्पर्धेत ९ शतकं झळकावली होती. आता गिलने हा विक्रम मोडून काढला आहे. गिल या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. या यादीत यशस्वी जैस्वालचा देखील समावेश आहे. यशस्वीच्या नावे ७ शतकं झळकावण्याची नोंद आहे. तर ऋषभ पंतने ६ आणि केएल राहुलने देखील ६ शतकं झळकावली आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारे भारतीय फलंदाज

शुबमन गिल- १० शतकं
रोहित शर्मा- ९ शतकं
यशस्वी जैस्वाल- ७ शतकं
ऋषभ पंत- ६ शतकं
केएल राहल- ६ शतकं

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button