
मंडणगड तालुक्यातील पिंपळोली येथील मशिदीमध्ये घरफोडी करून चोरट्याने सुमारे २ लाख ४७ हजार रुपयांचा चांदीचा ऐवज लांबविला
मंडणगड तालुक्यातील पिंपळोली येथील मशिदीमध्ये घरफोडी करून सुमारे २ लाख ४७ हजार रुपयांचा चांदीचा ऐवज चोरून नेला आहे. या चोरीमुळे पिंपळोली गावात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळोली येथील मशिदीत बुधवार, दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ८ वाजून १५ मिनिटांनी ते गुरुवार, ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पिंपळोली मुस्लिम मोहल्ला येथील रहिवासी आणि गावाचे काझी असलेले हुसेन इब्राहीम पेटकर (वय ८७) यांनी या चोरीची तक्रार दाखल केली आहे.
अज्ञात चोरट्याने मशिदीतील पाण्याच्या टाकीच्या रूमचे कुलूप कोणत्यातरी हत्याराने तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर रूममधील सागवानी बॉक्सला लावलेले कुलूप तोडून आतील चांदीचे मौल्यवान दागिने आणि वस्तू लबाडीच्या इराद्याने चोरून नेल्या.
चोरीस गेलेल्या मालात विशेषतः मशिदीवर लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे.




