
चिपळूण दाभोळ खाडीतील प्रदूषण प्रश्नाबाबत ’सेंट्रल इनलॅण्ड फिशरीज’ अभ्यास करणार
चिपळूण दाभोळ खाडीतील प्रदूषण प्रश्नाला आता वैज्ञानिक पडताळणीची जोड मिळणार आहे. लोटे एमआयडीसीमधील सीईटीपीमधून प्रक्रिया करून खाडीत सोडण्यात येणार्या सांडपाण्यामुळे मासे तसेच इतर सागरी जीवसृष्टीवर नेमका काय परिणाम होतो, हे समजून घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने भारत सरकारच्या वडोदरा येथील सेंट्रल इनलॅण्ड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटला अभ्यासाची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार या पावसाळ्यात खाडीतील नमुने घेत त्यावर या इन्स्टिट्यूटने आपले संशोधन सुरू केले आहे.
शहरातून गोवळकोट येथून सुरू होणारी ही खाडी दाभोळ येथे समुद्राला जाऊन मिळत आहे. चिपळूणसह गुहागर, खेड, दापोली अशा चार तालुक्यात सामावलेल्या या खाडीवर नदीकाठच्या मच्छीमारांचा उदरनिर्वाह अनेक वर्षापासून चालत आला आहे. लहान-लहान होड्यांमधून मासेमारी करणे हाच या परिसरातील कुटुंबांचा मुख्य व्यवसाय आहे. मात्र, लोटे औद्योगिक वसाहतीतून १९९७ मध्ये झालेल्या रासायनिक प्रदूषणानंतर ही खाडी चर्चेत आली. कालांतराने लोटेतील सीईटीपीमध्ये फार मोठे बदल झाले. विस्तारीकरणाबरोबरच प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या गेल्या असल्या तरी प्रदूषणाचा प्रश्न पूर्णपणे निकालात निघालेला नाही. खाडीत अधूनमधून मासे मरतुकी होतच असते. त्यामुळे या खाडीचा शास्त्रोक्त सर्व्हे करण्याचा निर्णय प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही महिन्यापूर्वी घेतला.www.konkantoday.com




