
शिवसेना पक्ष-चिन्हावर सुप्रीम काेर्टातील सुनावणी पुन्हा लांबणीवर^_____
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने १२ नाेव्हेंबरपासून अंतिम सुनावणी हाेईल, असे न्यायमूर्ती सूर्यकांत, उज्ज्वल भुयान आणि एनके सिंह यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
सुनावणी लवकर घ्या : ॲड. कपिल सिब्बल
न्यायमूर्ती सूर्यकांत, उज्ज्वल भुयान आणि एनके सिंह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाच्या वतीने युक्तीवाद केला. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुका जानेवारीमध्ये आहेत. कृपया लवकरात लवकर सुनावणी घ्या. कारण हा पक्ष नाव आणि चिन्हाचा प्रश्न आहे, अशी विनंती सिब्बल यांनी केली. यावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणी आम्ही १२ नोव्हेंबर २०२५ पासून अंतिम सुनावणी घेवू.
केंद्रीय निवडणूक आयोगाने फेब्रुवारी २०२३ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शिवसेना नाव आणि चिन्ह दिले होते. पक्ष नाव आणि चिन्ह यासाठी शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात गेली दोन वर्ष न्यायालयीन लढाई सुरु आहे. शिवसेना ठाकरे गटाने जुलै २०२५ मध्ये सर्वोच्च न्यायालयात पक्ष नाव आणि चिन्हा निर्णयासंदर्भात अंतरिम अर्ज केला होता. यामध्ये महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना शिंदेगटाला पक्षाचे नाव शिवसेना आणि चिन्ह धनुष्यबाण चिन्ह गाेठविण्यात यावे, अशी मागणी केली होती. यावर ऑगस्ट महिन्यात सुनावणी होणार होती. मात्र ती लांबणीवर पडली. मात्र या प्रकरणाला आता सुमारे दोन वर्ष झाली आहेत. त्यामुळे आम्ही या प्रकरणाचा निकाल देऊ, असे मागील सुनावणीवेळी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी स्पष्ट केले होते.




