
कोकणातील सहकार चळवळीस नवा वेग : रत्नागिरीत जिल्हा सहकारी बोर्ड सक्षमीकरणावर महत्वपूर्ण बैठक
.रत्नागिरी ) :
महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, पुणे संलग्न रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बोर्डांच्या सक्षमीकरणासाठी रत्नागिरी येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली. रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष हेमंत वणजु यांच्या पुढाकाराने ही बैठक घेण्यात आली होती. विशेष म्हणजे राज्य संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत इतिहासात प्रथमच अशा स्वरूपाची बैठक कोकणात झाली.

एमआयडीसी विश्रामगृह येथे पार पडलेल्या या बैठकीला तिन्ही जिल्ह्यांतील पदाधिकारी, अधिकारी तसेच राज्य संघाचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला आमदार प्रवीण दरेकर यांची महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्डाच्या वतीने माजी अध्यक्ष प्रभाकर शेट्ये यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
शिक्षण निधीअभावी अडचणीत बोर्ड
बैठकीत जिल्हा बोर्डांसमोरील आव्हानांची सविस्तर चर्चा झाली. सध्या कोणत्याही स्वरूपात शिक्षण निधी न मिळाल्याने केवळ प्रशिक्षण कार्यावर चालणाऱ्या या संस्था बिकट परिस्थितीत असल्याचे तिन्ही जिल्ह्यांच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले.
दरेकर यांचे आश्वासन
या पार्श्वभूमीवर आमदार प्रवीण दरेकर यांनी जिल्हा बोर्डांच्या सक्षमीकरणासाठी काही महत्त्वपूर्ण आश्वासने दिली.

जिल्हा बोर्डांनी सभासद संख्या वाढवावी.
राज्य संघ आधुनिक पद्धतीचे सहकार प्रशिक्षण उपलब्ध करून देईल.
कोकणातून ५ प्रशिक्षकांची नावे सुचविण्याचे आवाहन.
जिल्हा बँकांच्या सहकार्याने प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यावर भर.
मुख्यमंत्री स्तरावर शिक्षण निधीबाबत लवकरच चर्चा करून सकारात्मक उपाययोजना केली जाईल.
तसेच राज्य संघाच्या प्रशिक्षण निधीतून जिल्हा बोर्डांना वाटा मिळावा यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.
प्रलंबित निधी व अनुदानाबाबत चर्चा
राज्य संघ सक्षम झाला तर जिल्हा बोर्ड सक्षम होईल, तसेच राज्य संघाकडे प्रलंबित रक्कम लवकर मिळावी अशी मागणी माजी अध्यक्ष प्रभाकर शेट्ये यांनी केली. कोकणात सहकारभाव वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत अशी मागणीही रत्नागिरी जिल्हा बोर्डाने केली.
यावर उत्तर देताना दरेकर म्हणाले की, जिल्हा बोर्डांची थकबाकी सोडविण्यासाठी राज्य संघ प्रयत्नशील राहील. बोर्डांचे उत्पन्न वाढविण्यासाठी नवीन उपाययोजना विचाराधीन आहेत. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून प्रशिक्षण मेळावे आयोजित करण्याचाही प्रयत्न केला जाईल.
सहकार सप्ताह व परिषद
१४ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर दरम्यान होणारा सहकार सप्ताह यशस्वी करण्यासाठी प्रायोजक शोधण्याचे निर्देशही दरेकर यांनी दिले. तसेच लवकरच कोकणासाठी सहकार परिषद आयोजित केली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.
सुमारे दीड तास चाललेल्या या बैठकीत जिल्हा सहकारी बोर्ड सक्षमीकरणासाठी विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. इतिहासात प्रथमच अशा प्रकारे कोकणात बैठक झाल्याने सहकार क्षेत्राला नवा वेग मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. आमदार प्रवीण दरेकर यांच्या प्रयत्नांमुळे जिल्हा बोर्ड पुन्हा सक्षम होईल अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.




