लाडकी बहीण योजना, अतिवृष्टीमुळे निधीची चणचण, ‘आनंदाचा शिधा’वरून छगन भुजबळ यांची कबुली!

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसेच पूरग्रस्तांना कराव्या लागणाऱ्या मदतीमुळे राज्याचे आर्थिक नियोजन पार कोलमडल्याचे अन्न व नागरीपुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी कबूल केले.

पुरेसा निधी नसल्याने ‘आनंदाचा शिधा’ ही योजनाही यंदा राबविता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वर्षाला ४० ते ४५ हजार कोटी खर्च होणार असल्याने त्याचा अन्य खात्यांच्या आर्थिक तरतुदींवर परिणाम होणे स्वाभाविक असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतकऱ्यांना मदत करावी लागणार आहे. या साऱ्यांचा सरकारच्या आर्थिक नियोजनावर परिणाम होणार आहे. सार्वजनिक बांधकामापासून सर्वच खात्यांना आर्थिक नियोजन कोलमडल्याचा फटका बसणार आहे. यामुळेच यंदा ‘आनंदाचा शिधा’ ही योजना राबविणे शक्य नसल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले.

आर्थिक परिस्थितीबाबत सरकारमध्ये चर्चा झाली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यात तर ठेकेदारांची बिले रखडल्याची तक्रार आहे, असे भुजबळ यांनी सांगितले. दरम्यान, लाडकी बहीण योजनेमुळे राज्याचे वित्तीय नियोजन कोलमडल्याची कबुली देणारे भुजबळ हे महायुती सरकारमधील पहिलेच मंत्री आहेत. यापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी परखड भाष्य केले होते.

तर योजना पुढे कशी राबवणार?

महायुती सरकारने २०२२ मध्ये सुरू केलेल्या आनंदाच्या शिधा योजनेचा राज्यातील सुमारे दोन कोटी नागरिकांना लाभ झाला होता. या योजनेसाठी वार्षिक ५०० कोटींची आवश्यकता आहे. याशिवाय ‘शिवभोजन थाळी’ योजनेसाठी वर्षाला १४० कोटींची आवश्यकता असताना अन्न व नागरीपुरवठा खात्याच्या वाट्याला केवळ ७० कोटी रुपयेच आले. त्यातून ही योजना पुढे कशी सुरू ठेवणार? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button