
अपुऱ्या माहितीच्या आधारे “एमएसएम इंफ्रास्ट्रक्चर”ची बदनामी करण्याचा प्रयत्न
- कंपनीकडून तत्काळ खुलासा जाहीर
- दोन तासांत माफी न मागितल्यास कायदेशीररीत्या अब्रुनुकसानीचा दावा करणार
रत्नागिरी : शहराजवळील शिरगाव शिवरेवाडी तिवंडेवाडी परिसरातील केलेल्या रस्त्याच्या कामाबद्धल काही अपुऱ्या माहितीच्या आधारे आज (६ ऑक्टोबर) मे. माधवी सुरेंद्रनाथ माने (एमएसएम) इंफ्रास्ट्रक्चर या कंपनीविरोधात आंदोलनाचे व्हिडीओ व फोटो पसरविण्यात आले आहेत. यासंदर्भात मे. माधवी सुरेंद्रनाथ माने एमएसएम इंफ्रास्ट्रक्चर या कंपनीने जाहीर खुलासा केला असून, ज्या व्यक्तींनी चुकीच्या माहितीद्वारे आंदोलन करून व जाणूनबुजून स्वप्रसिद्धीसाठी आमच्या कंपनीची व मालकांची अब्रुनुकसानीचा प्रयत्न चालू असून त्यांनी तत्काळ २ तासामध्ये जाहीर माफी मागावी अन्यथा आम्ही कायदेशीररीत्या अब्रुनुकसानीचा दावा करण्यात येईल, असे या खुलाशात नमूद करण्यात आले आहे.
याबाबत जाहीर केलेल्या खुलाशात म्हटले आहे की, “आज (६ ऑक्टोबर २०२५) काही ठिकाणी समाज माध्यमांवर मे. माधवी सुरेंद्रनाथ माने (एमएसएम) इंफ्रास्ट्रक्चर या कंपनीने शिरगाव – शिवरेवाडी – तिवंडेवाडी परिसरातील केलेल्या रस्त्याच्या कामाबद्धल काही अपुऱ्या माहितीच्या आधारे आंदोलनाचे काही व्हिडीओ व फोटो पहिले. तथापि आम्ही खुलासा करत आहोत की, हे काम रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून मंजूर झाले आहे. एकूण ७७५ मीटर लांबीचे काम मंजूर असून, निविदा रक्कम ही २३.०५ लक्ष होती. आमच्या कंपनीद्वारे हे काम ९.९९ टक्के कमी दराने म्हणजेच २०.५५ लक्ष रुपये इतक्या रकमेला निविदा प्राप्त झाली होती. आमच्या कंपनीने कि.मी ०/३३० ते किमी १/२३३ हा ९०३ मीटर लांबीचा जो रस्ता खराब झालेला होता त्याचे काम पूर्णत्वास आणले. आमच्या कंपनीने निविदेमध्ये नमूद ७७५ मीटर लांबी इतके काम असूनही ग्रामस्थांच्या अग्रहास्थव वाढीव १२८ मीटरचे काम करण्यात आले.”
“हे काम पूर्ण केल्यानंतर संबंधित विभागाकडून तपासणी होऊन त्याचे रुपये १९.७२ लक्ष इतके बिल रेकॉर्ड करण्यात आले. व त्यापैकी रुपये १३.०६ लक्ष इतक्या रकमेचे बिल ६ महिन्यानंतर सप्टेंबर २०२५ मध्ये प्राप्त झाले. हे नमूद लांबीमधील पूर्ण झालेल्या कामामध्ये २ वर्षासाठी दुरुस्तीची जबाबदारी ही निविदा नियमानुसार आमची असून ती वेळोवेळी करण्यास आम्ही बंधनकारक राहू; परंतु ज्या ठिकाणी आंदोलन झाले त्या ठिकाणचा रस्ता आमच्या कंपनीद्वारे करण्यात आलेला नाही. तरी काही व्यक्तींनी लोकप्रियतेसाठी व स्वप्रसिद्धीसाठी हे आंदोलन केले हे दिसून येते. म्हणून आम्ही हा खुलासा ग्रामस्थ व नागरिकांसाठी सादर करीत आहोत.”
“ज्या व्यक्तींनी चुकीच्या माहितीद्वारे आंदोलन करून व जाणूनबुजून स्वप्रसिद्धीसाठी आमच्या कंपनीची व मालकांची अब्रुनुकसानीचा प्रयत्न चालू असून त्यांनी तत्काळ २ तासामध्ये जाहीर माफी मागावी अन्यथा आम्ही कायदेशीररीत्या अब्रुनुकसानीचा दावा करण्यात येईल,” असेही या खुलाशात नमूद करण्यात आले आहे.




