
राणेंनी पोरांना आवरावं, संजय राऊत यांचा इशारा
रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांना मंत्री नितेश राणे यांनी सुद्धा दुजोरा दिला आहे. ज्यामुळे हा वाद आता वाढला असून याच मुद्द्यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार नारायण राणे यांना इशारा देत “पोरांना आवरा” असे म्हटले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी (ता. 5 ऑक्टोबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांबाबत आणि त्याला मंत्री नितेश राणेंना दिलेल्या दुजोऱ्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, रामदास कदम यांच्यावर प्रतिक्रिया देण्याइतके ते महान नाहीत हे काल उद्धव ठाकरे बोलले. हे नमकहराम नाही तर काय आहेत? ‘मातोश्री’वर भरभरून नमक खाल्ले, पद, प्रतिष्ठा, संपत्ती मिळवली आणि आता टांग वर करताहेत. यांना नमकहराम नाही तर काय म्हणायचे? हे बेईमान आहेत. यांना याची किंमत मोजावी लागणार. मोदी, शहा, फडणवीस यांना वाचवणार नाहीत. ज्यांनी बाळासाहेबांसंदर्भात दळभद्री वक्तव्य केली त्यांना कुणीही माफ करणार नाही, असे हल्लाबोल यावेळी राऊतांनी केला.
तसेच, ज्यांनी बाळासाहेबांच्या जीवावर आयुष्यभर खाल्ले आणि इमले उभारले, ते बाळासाहेबांची त्यांच्या मृत्युनंतर विटंबना करतात. त्यांना लाजा वाटल्या पाहिजे. मृत्यूनंतर बाळासाहेबांची विटंबना करता आणि त्यांचा फोटो लावता मागे, लाजा वाटत नाही का. नारायण राणेंनी त्यांच्या पोरांना आवरावे. तुम्ही मंत्री असाल तुमच्या घरी. सत्ता येते, सत्ता जाते. लोक रस्त्यावर धुतल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच राऊतांकडून राणेंना देण्यात आला आहे. तर, अनिल परब यांनी अत्यंत गंभीर मुद्दा मांडलेला असून त्याची चौकशी झाली पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांच्या ठशाची चौकशी करणाऱ्यांची लायकी नाही त्यांचे नाव घ्यायचे. खरं तर गृहमंत्र्यांनी रामदास कदम यांच्या पत्नीच्या मृत्यूची चौकशी केली पाहिजे. पण, आमच्या अंगावर आला तर याद राखा, अनिल परब यांच्याकडे असा स्फोटकांचा बराच साठा पडला असून तुम्हाला तोंड दाखवणे मुश्कील होईल, असा इशारा सुद्धा राऊत यांनी दिला.




