महाराष्ट्रातील पहिल्या एचपीव्ही लसीकरणाचा प्रारंभमहिलांना कॅन्सरचा स्पर्श होऊ नये, ही भूमिका घेणारा राज्यातला रत्नागिरी पहिला जिल्हा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत


रत्नागिरी, दि.4 ) : कॅन्सर झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा तो होऊच नये म्हणून जिल्ह्याच्या प्रशासनाने लसिकरणाची जबाबदारी स्वीकारली हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. माझ्या जिल्ह्यातल्या विद्यार्थीनींना, महिलांना कॅन्सरचा स्पर्श होऊ नये, भावी पिढीला कॅन्सर होणार नाही त्यांचं आयुष्य सुखा-समाधानानं निरोगी रहायला हवे, त्यासाठी जिल्ह्यातील 9 ते 14 वयोगटातील 50 हजार मुलींना एचपीव्ही लस देण्यात येणार आहे. लसीकरण करणारा रत्नागिरी हा राज्यातला पहिला आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून साडेचार कोटींचा निधी देण्याचं भाग्य मला मिळालं. हे पुण्याचं काम मी मानतो, अशा शब्दात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्हास्तरीय एचपीव्ही लस शुभारंभ कार्यक्रम येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात आज झाला. या कार्यक्रम प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, माजी जि. प. सदस्य बाबू म्हाप, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी आदी उपस्थित होते.


पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, कॅन्सरच्या बाबतीमध्ये काळजी घेत असताना, सगळ्यात महत्त्वाचं आरोग्याच्यादृष्टीने राज्यात पाहिलं पाऊल लसीकरणाचं उचललं तर ते रत्नागिरी जिल्ह्याने! रामबाण उपाय हा नंतर शोधण्यापेक्षा, तो होऊच नये याची जबाबदारी प्रशासनाने स्वीकारली हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आयुष्यामध्ये कॅन्सर सारखा आजार कधी होऊ नये, आयुष्य सुखासमाधानी रहावं यासाठी हे काम मी पुण्याचे मानतो. हा लसीकरणाचा कार्यक्रम फक्त जिल्ह्याला दिशा देणारा नाही तर, महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्राला दिशा देणारा आहे. एवढी ताकद या कार्यक्रमामध्ये आहे.


माझ्या भावी पिढीला कॅन्सर होणार नाही, कॅन्सरसारख्या रोगापासून भावी पिढी वाचली पाहिजे. त्यासाठी अजून निधी लागला तर तो डीपीसीमधून, सीएसआरमधून दिला जाईल. आपल्या घरात आर्थिक ताण पडू नये, म्हणून महिला स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात. प्रत्येक गावामध्ये आरोग्य केंद्रामध्ये माझ्या महिला भगिनींची तपासणी झाली पाहिजे. महिला भगिणींनीही आपल्या आरोग्याची तपासणी करुन काळजी घेतली पाहिजे.


सोशल मीडियावर लक्ष ठेवा
लसीकरणाच्या बाबतीत सोशल मीडियावर गैरसमज पसरणार नाही, याबाबत काळजी घ्या. त्यासाठी या लसीचे फायदे, त्याची माहिती याचा प्रसार पालकांमध्ये करावा. ज्येष्ठांना निमोनिया होऊ नये, त्यासाठीच्या लसीची माहिती घ्यावी. त्यावरही अभ्यास करावा. ती लस देखील ज्येष्ठांना देण्यासाठी आपण मागे राहणार नाही. शेवटी, माणसाचं आयुष्य वाढविणे, माणसाला जगविणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. जिल्ह्यातील कुपोषित माता, कुपोषित बालके यांची संख्या शुन्यावर व्हायला हवी. तसेच, या लसीपासून कोणीही वंचित राहणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये यांनी प्रास्ताविकात या लसीबाबत सविस्तर माहिती दिली.
एचपीव्ही लस
ह्युमन पॅपीलोमा व्हायरस म्हणजे एचपीव्ही. एचपीव्ही हा 200 हून अधिक विषाणूंचा समुह आहे. ज्यापैकी काही आरोग्य समस्या निर्माण करु शकतात. काही उच्च जोखिम असलेले एचपीव्ही प्रकार सर्व्हायकल कॅन्सर, रेक्टल कॅन्सर आणि थ्रोट कॅन्सरशी जोडलेले आहेत. एचपीव्हीशी संबंधित आजार टाळण्यासाठी किशोरवयीन मुलींकरिता याची शिफारस केली जाते. अनेक क्निनिकल चाचण्याद्वारे ही लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे सिध्द झाले आहे. सर्व्हायकल कॅन्सरचा नवीन संसर्ग रोखणे तसेच सर्व्हायकल कॅन्सरमुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करणे हे या लसीचे उद्दिष्ट आहे. या लसीचे सुरक्षिततेचे उत्कृष्ट रेकॉर्ड आहे. जगभरात लाखो डोस दिले जातात. ही लस संसर्गापूर्वी दिली गेली तर बचाव करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. या लसीकरणामुळे सर्व्हायकल कॅन्सरचा धोका टळतो.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला धन्वंतरी पुजन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण आणि दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला, विद्यार्थीनी उपस्थित होत्या.
000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button