कोंडिवरेतील रिक्षाचालकाच्या प्रसंगावधानतेमुळे व माखजन पोलिसांच्या तत्परतेमुळेकर्नाटकातून पळवून आणलेली अल्पवयीन मुलगी नातेवाईकांच्या ताब्यात…


संगमेश्वर तालुक्यातील
कोंडिवरेतील रिक्षाचालकाच्या प्रसंगावधानतेमुळे व माखजन पोलिसांच्या तत्परतेमुळे कर्नाटकातून पळवून आणलेली अल्पवयीन मुलगी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आली. याप्रकरणी निपाणी पोलिसांनी संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड येथील संशयित तरुणावर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.

याबाबत हकिगत अशी की, कोंडिवरे येथील रिक्षाचालक इरफान खान हा आपली रिक्षा घेऊन आरवलीच्या दिशेने चालला असताना याचदरम्यान एक मुलगी आरवली बाजूकडे रस्त्याने धावत चालली होती. इरफान खान यांनी आपली रिक्षा थांबवून तिला हटकले असता आपल्याला कोणीतरी पळवून आणलेले आहे, असे सांगून ती रडू लागली. ही बाब रिक्षाचालक इरफान खान यांनी तातडीने माखजन पोलिस दूरक्षेत्राचे सहायक पोलिस उपनिरीक्षक विवेक साळवी यांना कळवली. पोलिसांनी तत्परता दाखवून या अल्पवायीन मुलीला ताब्यात घेतले व कर्नाटकातील पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली असता या 17 वर्षीय तरुणीने आपले नाव सांगून आपण आदर्शनगर निपाणी, जि. बेळगाव, कर्नाटक येथील आहे, असे सांगून तिने आपण इयत्ता अकरावी कॉमर्समध्ये कागल, ता. कोल्हापूरमधील कॉलेजमध्ये शिकत असल्याची माहिती दिली.
20 सप्टेंबर 2025 रोजी कॉलेजला आले असता कागल बस स्टँडवर माझा वर्गमित्र विघ्नेश संजय गुरव (मूळ गाव बुरंबाड ता. संगमेश्वर सद्या रा. कागल) याने मला हत्याराचा धाक दाखवून येथून मला एसटी बसने पंढरपूर येथे घेऊन गेला. माझ्याकडील मोबाईल फोडून सीम तोडून टाकले. त्याने मला शस्त्राचा धाक दाखवून पंढरपूर येथे त्यानंतर मुंबई दादर येथे तेथून परत पंढरपूर, कराड आणि चार दिवसांपूर्वी संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड बौद्धवाडी या ठिकाणी त्याची आई अश्विनी संजय गुरव (राहणार कागल) हिच्या सोबत घेऊन आला. यादरम्यान विघ्नेश गुरव याने आपल्यावर बळजबरी केलेली असून त्याने ठार मारण्याची धमकी दिली होती. तसेच बुरंबाड येथील घरामध्ये कोंडून ठेवले होते.
दि. 1 ऑक्टोबर 2025 रोजी विघ्नेश आणि त्याची आई कोल्हापूर येथे निघून गेली होती त्यामुळे आज विघ्नेश याची आजी नंदा प्रभाकर पवार रा. बुरंबाड बौद्धवाडी दुपारच्या वेळी झोपली असताना संधीचा फायदा घेत ही तरुणी घराचे मागील दरवाजा उघडून बाहेर पळून गेली. ही तरुणी आरवलीकडे जात असताना रिक्षा चालक इरफान खान यांनी पाहिले व पोलिसांच्या ताब्यात दिले. माखजन पोलिसांनी निपाणी पोलिसांशी संपर्क साधल्यावर निपाणी पोलिसांनी संगमेश्वर येथे येऊन मुलीला ताब्यात घेतले असून या प्रकरणी अपहरण करणारा तरुण विघ्नेश संजय गुरव याच्यावर कारवाई सुरु केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button