
रामदास कदमांची अक्कल गुडघ्यात आहे, रामदास कदम यांच्या आरोपावरून अनिल परब भडकले.
रामदास कदम यांनी जे आरोप केले ते १०० टक्के खोटे आहेत. बाळासाहेबांना भेटायला असंख्य लोकांची गर्दी होती. कुठलाही मृतदेह २ दिवस शवपेटीशिवाय ठेवता येऊ शकतो का? रामदास कदमांची अक्कल गुडघ्यात आहे.शवागृह किंवा शवपेटीशिवाय मृतदेह २ दिवस ठेवता येऊ शकतो का? मातोश्रीवर तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक होते, ते २ दिवस मृतदेह ठेवू शकतात का? त्यामुळे कदम यांनी केलेले आरोप खोटे आहेत असं सांगत अनिल परब यांनी रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेतला.
अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना रामदास कदम यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच रामदास कदमांच्या बायकोनं जाळून घेतलं? याची देखील चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.
दसरा मेळाव्यात नीचपणा केलाय. नीच हाच शब्द लागू होतो. खरं म्हणजे याचं उत्तर देण्याची गरज वाटत नव्हती, कारण पोरीबाळी नाचवून त्यांची दलाली खाऊन किंवा भाड खाऊन भाडगिरी करणाऱ्यांना उत्तर द्यावं एवढी त्यांची लायकी नाही. आमचे दैवत, बाळासाहेब यांच्या मृत्यूवर संशय घेतला म्हणून उत्तर देतो. मी या विभागाचा विभाग प्रमुख आहे. शिवसेनेचा विभाग प्रमुख प्रत्येक गोष्टीला जबाबदार असतो. ती जबाबदारी माझ्याकडे होती. बाळासाहेबांच्या अंितम क्षणी २४ तास मी तिथे होते. मी सगळ्याचा साक्षीदार आहे. तिकडे प्रत्येक क्षणाला काय घडलं ते मी पाहिलंय, अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली.
रामदास कदम हे आता बाळासाहेब गेल्यानंतर जवळपास १४-१५ वर्षांनी कंठ फुटलाय. बाळासाहेब २०१२ ला गेले. २०१४ ला रामदास कदम मंत्री झाले. त्यांना मंत्री उद्धव ठाकरेंनी केलं. तेव्हा बाळासाहेबही नव्हते. जर उद्धव ठाकरे वाईट होते तर २०१४ ते २०१९ पर्यंत मंत्रीपद स्वीकारलं. मुलाला आमदारकी घेतली. जोपर्यंत ठाकरेंकडून मिळालं तोपर्यंत ते चांगले. स्वत:ला मराठा स्वाभिमानी समजता तर तेव्हाच पक्ष सोडायला हवा होता, असेही ते म्हणाले.
२०१२ ला रामदास कदम कोणत्या बाकड्यावर झोपले तो बाकडा मी शोधतोय. बाळासाहेब ज्या खोलीत होते, त्यावेळी २४ तास तिथं डॉक्टरांचं पथक होतं. प्रत्येक मिनिटाला देखरेख सुरू होती. असंख्य लोक भेटायला येत होते. बाळासाहेबांची प्रकृती खालावलेली होती. त्याचं राजकारण करायचं चाललंय. महाराष्ट्रातील प्रश्नापासून बाजूला नेण्याचा हा कुटिल डाव आहे, असा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, रामदास कदम यांनी काल उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करावी अशी मागणी केली होती. याबाबतही अनिल परब यांनी भाष्य केलं. नार्को टेस्ट करण्याची ती मागणी करतायत पण ती व्हावी असंही आमचं म्हणणं आहे. ज्या रामदास कदमांनी खोटे आरोप केले आहेत त्यांच्यांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करतोय .त्यातून जी रक्कम येईल दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाठवायचा निर्णय़ घेतला आहे, असं त्यांनी सांगितलं.
पुढे बोलताना, अजून एक नार्को टेस्ट व्हायला पाहिजे. १९९३ मध्ये रामदास कदमांच्या बायकोनं स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी नेमकं काय झालं होतं? खेडमध्ये कुणाला बंगले बांधून दिले हे समोर यायला पाहिजे




