सिंगापूरमध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना लुटले; दोन भारतीयांना १२ फटके आणि ५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा!

सिंगापूरमध्ये पर्यटनासाठी गेल्यानंतर हॉटेलच्या खोल्यांमध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोन महिलांना लुटण्याचा आणि त्यांच्यावर हल्ला करण्याचा आरोप असलेल्या भारतातील दोन पुरुषांना प्रत्येकी पाच वर्षे तुरुंगवास आणि १२ फटके मारण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. द स्ट्रेट्स टाईम्सच्या वृत्तानुसार, २३ वर्षीय अरोक्कियासामी डेसन आणि २७ वर्षीय राजेंद्रन मायिलरासन यांनी पीडितांना लुटताना दुखापत केल्याचा गुन्हा कबूल केला आहे.

न्यायालयात करण्यात आलेल्या युक्तिवादात म्हटले आहे की, अरोक्कियासामी आणि राजेंद्रन २४ एप्रिल रोजी भारतातून सिंगापूरला पर्यटनासाठी आले होते. दोन दिवसांनंतर, लिटिल इंडिया परिसरात फिरत असताना, एका अज्ञात पुरुषाने त्यांच्याकडे येऊन विचारले की त्यांना लैंगिक सेवांसाठी वेश्या हवी आहे का? त्यानंतर त्या पुरुषाने त्यांना दोन महिलांचा संपर्क दिला.

अरोक्कियासामीने राजेंद्रनला पैशांची गरज असल्याचे सांगून महिलांशी संपर्क साधून त्यांना हॉटेलच्या खोलीत लुटण्याचा सल्ला दिला, ज्याला राजेंद्रनने मान्यता दिली. त्यांनी त्या दिवशी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास हॉटेलच्या खोलीत एका महिलेला भेटण्याची व्यवस्था केली.

खोलीत प्रवेश केल्यानंतर, त्यांनी पीडितेचे हात व पाय कपड्याने बांधले आणि तिला चापट मारली. त्यांनी तिचे दागिने, २००० सिंगापूर डॉलर्स रोख, तिचा पासपोर्ट आणि बँक कार्ड लुटले.

नंतर रात्री ११ वाजताच्या सुमारास, त्यांनी दुसऱ्या हॉटेलमध्ये दुसऱ्या महिलेसोबत भेट आयोजित केली. ती आल्यावर, त्यांनी तिलाही लुटले. राजेंद्रनने ती ओरडू नये म्हणून तिचे तोंड दाबले होते. त्यांनी ८०० सिंगापूर डॉलर्स, दोन मोबाईल फोन्स व तिचा पासपोर्ट चोरला आणि परत येईपर्यंत खोली सोडू नये, अशी धमकी दिली.

दुसऱ्या पीडितेने दुसऱ्या दिवशी एका पुरुषाला या घटनेबाबत माहिती दिल्यानंतर अरोक्कियासामी आणि राजेंद्रन यांचे कृत्य उघडकीस आले.

न्यायालयात अरोक्कियासामी म्हणाला की, ‘माझ्या वडिलांचे गेल्या वर्षी निधन झाले. माझ्या तीन बहिणी आहेत, त्यापैकी एक विवाहित आहे आणि आमच्याकडे पैसे नाहीत. म्हणूनच आम्ही हे केले.’ तर राजेंद्रन म्हणाला, ‘माझी पत्नी आणि मूल भारतात एकटे आहेत आणि ते आर्थिक दृष्ट्या अडचणीत आहेत.’

सिंगापूर डेलीच्या वृत्तानुसार, सिंगापूरमध्ये दरोड्यादरम्यान दुखापत करणाऱ्यांना पाच ते २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते आणि त्यांना किमान १२ फटके मारले जाऊ शकतात.

https://chat.whatsapp.com/JdTscwkK04n3RWNSijpnIq?mode=ems_copy_t

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button