
समाजामध्ये ८० टक्के सज्जन व्यक्ती असून त्यांच्या सज्जन शक्तीला समाजासाठी, राष्ट्रासाठी सक्रिय करण्याची आवश्यकता-कोकण प्रांत संघचालक अर्जुन तथा बाबाजी चांदेकर
रत्नागिरी : समाजामध्ये ८० टक्के सज्जन व्यक्ती असून त्यांच्या सज्जन शक्तीला समाजासाठी, राष्ट्रासाठी सक्रिय करण्याची आवश्यकता आहे. २०४७ सालचा भारत देश विश्वगुरू असणार आहे. त्याकरिता पंच परिवर्तनाद्वारे समाजजागृती केली जाणार आहे. यामध्ये कुटुंब संवाद, पर्यावरणाचे रक्षण, समरसतायुक्त समाज, ‘स्व’त्व जागृती आणि नागरी शिष्टाचाराचे पालन या मुद्द्यांच्या समावेश आहे. संघाकडून यावर वर्षभरात विशेष भर दिला जाणार आहे, असे प्रतिपादन कोकण प्रांत संघचालक अर्जुन तथा बाबाजी चांदेकर केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रत्नागिरी शहराचा विजयादशमी उत्सव स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहामध्ये साजरा झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आशादीप संस्थेचे अध्यक्ष, श्रीमान भागोजीशेठ कीर ट्रस्टचे विश्वस्त अॅड. विनय आंबुलकर आणि नगर संघचालक वैद्य महेंद्र पाध्ये मंचावर उपस्थित होते.
श्री. चांदेकर यांनी संघाचे संस्थापक, प्रथम सरसंघचालक, देशभक्त प. पू. हेडगेवार यांची माहिती देऊन संघाची स्थापना कशी झाली व आजपर्यंतची ९९ वर्षांच्या वाटचालीचे प्रमुख टप्पे सांगितले. श्री. चांदेकर म्हणाले की, ‘व्यक्ती निर्माणातून राष्ट्रनिर्माण’ हा विचार घेऊन १९२५ साली विजयादशमीच्या मुहूर्तावर डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. संघाच्या कार्याला यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने येत्या विजयदशमी पासून पुढील एक वर्ष ‘शताब्दी वर्ष’ म्हणून विविध कार्यक्रमांनी साजरे करण्याचे संघाने ठरविले आहे. पुढील वर्षभरात टप्प्याटप्प्याने व्यापक गृहसंपर्क अभियान, हिंदू संमेलन, सामाजिक सद्भाव बैठक, प्रमुख नागरिक संवाद, युवकांसाठी कार्यक्रम आणि शाखा सप्ताह असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातील.
विजयादशमी उत्सवाची सुरवात शस्त्रपूजनाने करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या नित्य शाखेत होणारे विविध नित्य दिनक्रम प्रत्यक्ष शाखा लावून समाजासमोर दाखवले गेले. समाजाच्या मनात शाखा म्हणजे काय याचे सहज सोपे सरळ प्रारूप स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाच्या मंचावर सादर केले गेले.
प्रमुख पाहुणे अॅड. विनय आंबुलकर यांनी सांगितले, की कोणतीही संस्था १०० वर्षे पूर्ण करते, त्यात बदल हा महत्त्वाचा घटक आहे. योग्य कार्यपद्धती अनुसरणे हे आवश्यक असते. यातून संस्था पुढे जाते. रा. स्व. संघाने १०० वर्षे पूर्ण करून आता नव्या टप्प्यावर प्रवास करतोय. जुन्या कार्यकर्त्यांचे स्मरण करणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. १९२५ मध्ये शिरगावात दामलेंच्या घरी डॉ. हेडगेवार व वीर सावरकर यांची चर्चा झाली. त्यानंतर संघाची स्थापना झाली. रत्नागिरीशी निगडीत ही गोष्ट अभिमानास्पद आहे. कोणताही गाजावाजा न करता कार्य करणाऱ्या संघाचे विशेष कौतुक वाटते.
याप्रसंगी विविध प्रात्यक्षिकांना आणि पुस्तक विक्री व प्रदर्शनाला प्रतिसाद मिळाला. या उत्सवाला रत्नागिरी शहर परिसरातील हिंदू बंधु-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगर कार्यवाह माधव साळस्कर यांनी प्रास्ताविकामध्ये रत्नागिरीतील नगरातील रा. स्व. संघाच्या कार्याचा आढावा घेतला. निखिल आपटे यांनी सुरेख गीत सादर केले. राजेश आयरे यांनी सूत्रसंचालन केले.



