
श्री क्षेत्र टेरव येथे नवरात्रौत्सव उत्साहात संपन्न
चिपळूण : तालुक्यातील दसपटी विभागातील श्री क्षेत्र टेरव येथे भाविक व पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या तसेच महाराष्ट्र शासनाने यात्रास्थळ व पर्यटनाचा क दर्जा व तीर्थक्षेत्राचा ब दर्जा बहाल केलेल्या व नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या कुलस्वामिनी श्री भवानी वाघजाई देवस्थानात सालाबादप्रमाणे या वर्षीही आदिशक्ती जगद्जननी श्री भवानी वाघजाई मातेचा नवरात्रौत्सव पारंपरिक रूढी परंपरेप्रमाणे धार्मिक विधी व पूजन करून उत्साहात साजरा करण्यात आला.
विधीवत पूजन व मंत्रोच्चारात देवीची घटस्थापना केली. मंत्रोच्चार करून दोन दिप प्रज्वलित केले. देवस्थानच्या पुजाऱ्यांनी, मानकऱ्यांच्या हस्ते घटाची विधीवत पूजा करून घेतली. नवरात्रीत दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी लोटली होती. रात्री उशीरापर्यंत असंख्य माता भगिनी भवानी वाघजाई मातेची ओटी भरण्यास येत होत्या. उत्सवादरम्यान अभिषेक, पूजा-अर्चा, चंडीपाट, नवचंडी याग, हरिपाठ, संगीत भजन आदी धार्मिक कार्यक्रमांचे तसेच रासगरबा, जाखडी नृत्य व हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन केले होते. नवरात्रीत १० दिवस भाविकांना शिरा, जिलेबी, लाडू इ. प्रसादाचे वाटप करण्यात आले.
पालखी सजवून रूपे लावण्यात आली होती व अश्विन शु. नवमीला ब्राह्मणाद्वारे विधीवत पूजा करण्यात आली. पुजाऱ्यांनी मानकऱ्यांच्या हस्ते रुढीवत पूजा करून घेतली. मानकऱ्यांच्या हस्ते प्रतिकात्मक बळी देऊन देवीचे घट हलविण्यात आले. रात्री पालखी नाचवत ढोल-ताशांच्या गजरात मंदिरा भोवती प्रदक्षिणा घालून छबिना काढण्यात आला, त्यात समस्त ग्रामस्थ, भाविक सामील झाले होते. एका दानशूर भक्ताने गेल्या अनेक वर्षांप्रमाणे यावर्षीही मंदिरास तसेच उद्यान परिसरात नेत्रदीपक विद्युत रोषणाई करून प्रवेशद्वार तसेच देवींचे गाभारे आकर्षक फुलांनी सजवून आजोळच्या आई भवानी – वाघजाई चरणी आपली सेवा रुजू केली.
श्री भवानी, वाघजाई, कालकाई, महालक्ष्मी, कुलस्वामीनी या देवींना नवरंगाच्या साड्या परिधान करून सोन्या-चांदीच्या अलंकारांनी सालंकृत करण्यात आले होते.
श्री जगतगुरु नरेंद्र महाराज सेवा समिती यांच्या विविध केंद्रांच्या वतीने अनेक महिला भगिनींनी सतत १० दिवस मंदिर आणि मंदिर परिसर स्वच्छ करून आपली सेवा रुजू केली. टेरवचे सुपुत्र चिराग शैलेशराव मोरे यांनी ड्रोन कॅमेऱ्याने विद्युत रोषणाई, फुलांची सजावट, उद्यान, मंदिर, देवदेवतांचे मूर्ती, मंदिर परिसराचे केलेले व्हिडीओ हे खास आकर्षण ठरले होते.
या उत्सवादरम्यान लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी , विद्यार्थी व महाराष्ट्रातूनच नव्हे तर कर्नाटक, गुजरात व इतर अनेक राज्यांतून आलेल्या भाविकांनी व मान्यवरांनी दर्शनाचा लाभ घेतला. अनेक भाविकांनी आपले नवस फेडले.
दसऱ्याला रूढी परंपरेप्रमाणे पूजन करून ग्रामस्थांनी मंदिरात सोने लुटून, परस्परांना वाटून एकमेकांना शुभेछा दिल्या. असंख्य भाविक, पर्यटक, ग्रामस्थ, माहेरवाशिणी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जगदंबेच्या दर्शनाचा लाभ घेतल्याबद्दल तसेच हा नवरात्रौत्सव भव्य दिव्य स्वरूपात व आनंदात साजरा व्हावा म्हणून ज्यांनी ज्यांनी विशेष श्रम घेतले व सहकार्य केले त्या सर्वांचे मंदिर व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.




