
शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्याकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाविषयी धक्कादायक दावे
मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडा. या मेळाव्यात बोलताना शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाविषयी धक्कादायक दावे केले आहेत.बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीत का ठेवण्यात आला? याचा तपास करावा अशी मागणी रामदास कदम यांनी केली होती. रामदास दकम यांच्या या आरोपावर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी यावर भाष्य केलं आहे. रामदास कदम यांनी आपल्या दसरा मेळाव्याच्या भाषणात बोलताना म्हटलं की, ‘शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन कधी झाले? आणि त्यांचा मृतदेह मातोश्रीवर किती दिवस ठेवण्यात आला होता, याची माहिती काढावी अशी माझी एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती आहे. मी हे विधान जबाबदारीने करतो आहे. मी हे फार मोठं विधान करतो आहे, शिवसेनाप्रमुखांवर उपचार करणारे डॉक्टर सध्या आहेत. त्या डॉक्टरांना विचारून घ्या. दोन दिवस बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह उद्धव ठाकरे यांनी का ठेवला होता. त्यांचं अंतर्गत काय चाललं होतं? असा सवालही कदम यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना कदम यांनी म्हटले की, ‘मी त्या काळात आठ दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलेलो आहे. मला सगळं कळत होतं. पण हे सारं कशासाठी करण्यात आलं. मला कोणीतरी सांगितलं की माँसाहेबांच्या हातांचे ठसे घेण्यात आले होते. मग हे ठसे कशासाठी घेण्यात आले होते. नेमकं काय होतं? मातोश्रीमध्ये सगळी चर्चा चालू होती. बाळासाहेब ठाकरे यांचं मृत्युपत्र कोणी केलं? हे मृत्युपत्र कधी झालं? त्यात सही कोणाची होती? या सर्व गोष्टींची माहिती काढावी असं रामदास कदम यांनी म्हटलं होतं.रामदास कदम यांच्या आरोपांवर बोलताना ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी, ‘हे सगळे आरोप खोटे आहेत, फालतू आहे तो. काहीतरी बोलत आहे इतक्या मोठ्या माणसाबाबत. आम्ही पण त्यावेळी तिथे होतो. फालतू आहे तो’ असं विधान केलं आहे.




