
चिपळूण शहरातील मच्छि व मटण मार्केट इमारत वापरासाठी आणण्यासाठी नगर पालिका प्रशासनाचे जोरदार प्रयत्न सुरू
गेल्या वीस वर्षापासून पडीक असलेली चिपळूण शहरातील मच्छि व मटण मार्केट इमारत वापरासाठी आणण्यासाठी नगर पालिका प्रशासनाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या इमारतीतील गाळ्यांची लिलाव प्रक्रिया राबविण्यासाठी आवश्यक तात्पुरत्या दुरूस्तीचे कामही जलद गतीने सुरू आहे. रंगरंगोटीचे कामही अंतिम टप्प्यात आल्याने या इमारतीला आता नवा साज चढला आहे. दरम्यान या कामावर माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी आक्षेप घेत स्ट्रक्चरल ऑडिट प्रमाणे दुरूस्तीचे काम करण्याची मागणी केली होती. मात्र तरीही हे काम प्रशासनाने सुरूच ठेवल्याने इनायत मकादम आता कोणती भूमिका घेतात, याकडे चिपळूणवासियांचे लक्ष लागले आहे.
चिपळूण नगर पालिकेमार्फत साधारणतः २००६ मध्ये मच्छि व मटण मार्केटच्या इमारतीचे काम हाती घेण्यात आले. त्यानंतर काही वर्षातच हे काम पूर्ण करण्यात आले. मात्र अंतिम टप्प्यातील काही कामे बारगळी. त्यामुळे या इमारतीला अखेरपर्यंत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाला नाही. परिणामी २० वर्षे हा प्रकल्प रखडला असून येथील व्यापारी या सुविधेपासून वंचित राहिले आहेत. आता या प्रकल्पाच्या लोकार्पणासाठी प्रयत्न केले जात आहेत. पुढील ३० वर्षाच्या मुदतीसाठी लिलाव प्रक्रिया राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याप्रमाणे काही महिन्यापूर्वी आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधित व्यापार्यांची बैठक घेतली जात होती. या बैठकीला व्यापार्यांना आवश्यक असलेल्या सोयी सुविधा नगर पालिकेकडून दिल्या जातील, मात्र व्यापार्यांनी आधी लिलावात सहभागी होण्याच्या सूचना मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केल्या होत्या. त्यानुसार व्यापार्यांनी देखील प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती.www.konkantoday.com




