
भाजपा आता एकपेशी अमिबा झालाआहे’-उद्धव ठाकरें
भाजपा आता एकपेशी अमिबा झाला आहे. वेडावेकडा पसरतो, वाटेल त्याच्याशी युती करतो. पण पेशी एकच. समाजात घुसले की अशांतता पसरवतात अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी दसऱ्या मेळाव्यात केली
उद्धव ठाकरेंनी दसऱ्या मेळाव्यातील भाषणातून लाडकी बहीण योजनेमागे मोठं षडयंत्र असल्याचा दावा केला आहे. भाजपा पगारी मतदार तयार करत आहे असा आरोप त्यांनी केला आहे.मते विकत घेण्यासाठी पैसे आहेत पण शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत असा आरोपही त्यांनी केला आहे. आपण पगारी मतदार व्हायचं की स्वाभिमानी हे महिलांनी ठरवायचं आहे असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
“निवडणूक आल्यानंतर महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये टाकले आहेत. महिलांनाही त्याची थोडी मदत झाली. पण शेतकरी म्हणाला भाजपा पगारी मतदार तयार करत आहे. महाराष्ट्राने ठरवायचं आहे की आपण पगारी मतदार व्हायचं की स्वाभिमानी हे महिलांनी ठरवायचं आहे.सर्व कामं रद्द करुन एक फूल, दोन हाफ दिल्लीत जाऊन बसायला हवे होते. सगळे निकष ठेवून मदत करा असं सांगायला हवं होतं. पण पंतप्रधानांना प्रस्ताव हवा आणि मुख्यमंत्र्यांचा अभ्यास सुरु आहे. त्यांना माहिती आहे की, काही दिवसांनी लोक विसरुन जातात,” असा दावा त्यांनी केला आहे.
पंतप्रधानांनी बिहारमध्ये महिलांच्या खात्यात 10 हजार टाकले. एकूण 10 हजार कोटी दिले होते. तेव्हा प्रस्ताव आला होता का? निवडणूक असल्यानंतर प्रस्तावाची गरज नाही. मते विकत घेण्यासाठी पैसे आहेत पण शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत हा माझा जाहीर आरोप आहे. मागील निवडणुकीतही त्यांनी बिहारमध्ये लिलाव करत किती कोटी देऊ विचारलं आणि सव्वा लाख कोटी जाहीर केले होते. महाराष्ट्रावर अन्याय करत असून, तुम्हाला सूड घ्यायचा आहे असा आरोपही त्यांनी केला. म्हणून भाजपा आणि सरकार यांचा सुतराम संबंध नाही असंही ते म्हणाले.
…अन्यथा मराठवाड्यात रस्त्यावर उतरणार
तात्काळ मदत जाहीर करा अन्यथा मराठवाड्यात रस्त्यावर उतरणार असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे. जिथे अन्याय दिसेल तिथे वार करायचा असं आवाहन त्यांनी शिवसैनिकांनं केलं आहे.
राज ठाकरे आणि तुम्ही एकत्र येणार का?
राज आणि मी 5 जुलैला काय केलं होतं. तेव्हाच आम्ही एकत्र राहण्यासाठी आलो आहोत. जिथे मातृभाषेचा घात असेल तिथे मराठी माणसात फूट पडू देणार नाही. आमचा हिंदीला विरोध नाही. पण सक्ती करायची नाही. भाषावर प्रांतरचना झाली त्यानुसार प्रत्येक भाषेला प्रांत मिळाला. तसा मराठीला महाराष्ट्र मिळाला. प्रत्येक राज्याला सरकार, राजधानी मिळाली. पण रक्त सांडून मिळवलेली मुंबई व्यापाऱ्यांच्या खिशात जाणार असेल तर तर खिसा फाडू. आमच्या मराठीला हात लावून तर बघा असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
‘जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाशी करतो तो बेशरम’
एशिया कप जिंकल्यानंतर जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाशी करतो तो बेशरम आहे. ऑपरेशन सिंदूर हे थोतांड कशाला केलं? पहलगाममध्ये धर्म विचारुन गोळ्या घातल्याचं तुम्ही सांगितलं ना. तुमच्या देशात हिंदू सुरक्षित नाही. त्या अतिरेक्यांच्या देशासोबत तुम्ही क्रिकेट खेळता. बाप ढोंग करतो आणि पोरगा क्रिकेट खेळतो ही तुमची ढोंगी घराणेशाही. म्हणून मला ठाकरेंच्या घराणेशाहीचा अभिमान आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘तुमच्या संज्ञा खड्ड्यात घाला पण शेतकऱ्यांना मदत करा’
आताचे मुख्यमंत्री आपलं राज्य असताना ओला दुष्काळ जाहीर करा ओरडत होते आणि आता ही संज्ञाच नाही म्हणतात. तुमच्या संज्ञा खड्ड्यात घाला पण त्यांना मदत द्या. सगळे निकष बाजूला ठेवून हेक्टरी 50 हजाराची मदत केली पाहिजे. आपलं सरकार असताना कोणतेही निकष न लावता मदत केली होती असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
‘कमळाबाईने चिखल करुन ठेवला आहे’
सोनम वांगचुक या माणसाने अतिशय लेह, लदाखमधील दुर्गम भागात जवानांसाठी तंत्रज्ञान उभं केलं. पाणी मिळालं पाहिजे म्हणूनही योजना आणली. मोदीही स्तुती करत होते. पण हक्कासाठी आंदोलन सुरु केल्यानंतर सरकार ढुंकून पाहायला तयार नाही. नेपाळप्रमाणे झेन जी रस्त्यावर आले आणि मोदी सरकारने अटक करुन तुरुंगात टाकलं. हाच जनसुरक्षा कायदा आपल्याल मोडून काढायचा आहे. मोदींची स्तुती करत असताना सगळं काही ठीक होतं, पण विरोधात गेल्यानंतर कारवाई होते. न्याय मागणं देशद्रोह होत आहे. कमळाबाईने चिखल करुन ठेवला आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
‘भाजपा आता एकपेशी अमिबा झाला आहे’
भाजपा आता एकपेशी अमिबा झाला आहे. वेडावेकडा पसरतो, वाटेल त्याच्याशी युती करतो. पण पेशी एकच. समाजात घुसरले की अशांतता पसरवतात.




