
खेड तालुक्यातील मोरवंडे-पिंपळवाडी येथील उंदीर मारण्याचे औषध प्राशन केल्याने तरुणाचा मृत्यू
खेड तालुक्यातील मोरवंडे-पिंपळवाडी येथील २७ वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत रेटॉल नावाचे उंदीर मारण्याचे औषध प्राशन केल्याने मृत्यू झाला. संकेत रवींद्र कदम असे मृत तरुणाचे नाव आहे. नोकरी नसल्याच्या मानसिक तणावातून त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. आहे. १२ सप्टेंबर रोजी त्याने बस थांब्याजवळ दारुच्या नशेत उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. यानंतर स्वतःच उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाला. वैद्यकीय अधिकार्यांनी याबाबत त्याचा चुलत भाऊ राहुल रवींद्र कदम यांना कळवले. प्रकृती गंभीर बनल्याने अधिक उपचारासाठी मुंबई के. ई. एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. ठाणे-मुंबई-भोईवाडा पोलिसांनी याबाबत येथील पोलीस ठाण्यात कळवल्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
www.konkantoday.com




