अतिक्रमण उपायुक्त शंकर पाटोळे यांना मुख्यालयातच लाच घेताना अटक, 25 लाखांची तोडपाणी करताना रंगेहाथ जाळ्यात

ठाणे : अतिक्रमण हटवण्यासाठी २५ लाखांची तोडपाणी करताना ठाणे पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना एसीबीने बेड्या ठोकल्या आहेत. १५ लाखांची लाच घेताना पाटोळे एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत.

महापालिकेच्या वर्धापनदिनीच एसीबीने ही धडक कारवाई केल्याने खळबळ उडाली असून भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान या कारवाईने ठाणे शहरातील बेकायदा बांधकामांवरून पालिकेच्या आजी-माजी अधिकाऱ्यांच्या सुरू असलेल्या चौकशीची चर्चा रंगली आहे.

ठाणे शहरातील बेकायदा बांधकामांवरून न्यायालयाने दणका दिल्यानंतर अतिक्रमण विभाग खडबडून जागे झाले असून कारव्-गाईचा सपाटा लावण्यात आला आहे. घोडबंदर रोडवर अभिजित डेव्हपर्सचे अभिजित कदम यांचे बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी असलेले अतिक्रमण हटवण्यासाठी कदम पालिकेत चकरा मारत होते. मात्र हे अतिक्रमण हटवण्यासाठी अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी २५ लाखांची लाच मागितली होती. यामध्ये १५ लाख रोख व १० लाख रुपये एका व्यक्तीच्या खात्यात जमा करण्याचे ठरले होते. मात्र दहा लाख रुपये देऊनही अतिक्रमण काढले जात नव्हते. कदम यांनी मुंबई एसीबीकडे तक्रार केली होती.

दीड तासाच्या चौकशीनंतर उचलले

कदम यांच्या तक्रारीनंतर पथकाने मुख्यालयाच्या तळमजल्यावर सापळा रचला. १५ लाखांची लाच घेताना एसीबीने पाटोळे यांच्यावर झडप घातली. एक ते दीड तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. राजकीय हितसंबंध असल्यामुळे ठाणे एसीबी कारवाई करू शकत नाही. त्यामुळे मुंबई एसीबीकडे तक्रार करण्यात आली होती. अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, मुंबई एसीबीने आज संध्याकाळी सापळा रचत पाटोळे यांना रंगेहाथ पकडले आहे.

वादग्रस्त ऑडिओ क्लिपमध्ये शिंदे गटाच्या नगरसेवकांची नावे

दोन दिवसांपूर्वीच अतिक्रमण विभागातील एका माजी अधिकाऱ्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती. यामध्ये या माजी अधिकाऱ्याने शंकर पाटोळे यांच्यासकट सेवेत असलेल्या अधिकारी आणि शिंदे गटातील माजी नगरसेवकांची नावेदेखील घेतली होती. त्यामुळे यामध्ये ठाणे पालिकेचे इतर अधिकारी तसेच शिंदे गटातील माजी नगरसेवकही बेकायदा बांधकाम प्रकरणात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button