
‘भारतीय वन्यजीव सप्ताह’ निमित्त वन्यजीव संवर्धनासाठी २ ते ८ आॕक्टोबर विविध कार्यक्रम
रत्नागिरी, दि. १ ): वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी २ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत भारतीय वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर, रत्नागिरी (चिपळूण) वनविभागामार्फत या सप्ताहात विविध प्रबोधनात्मक आणि उपक्रमशील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध कार्यक्रमांचा लाभ घेऊन वन्यजीव संवर्धनाच्या कार्यात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई यांनी केले आहे.
वन्यजीवांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने, १९७२ मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय वन्यजीव मंडळाद्वारे हा कार्यक्रम आयोजित केला जातो.
सप्ताहातील प्रमुख कार्यक्रम:
२ ऑक्टोबर : इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ‘संगीत बिबट अख्यान’ हा कार्यक्रम
३ ऑक्टोबर : सायंकाळी ७ वा पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या हस्ते विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) यांच्या कार्यालयाच्या आवारात नवनिर्मित फोटो गॅलरी व कॉन्फरन्स हॉलचे उद्घाटन
४ ते ६ ऑक्टोबर : सह्याद्री संकल्प सोसायटी कार्यकारी संचालक प्रतीक शांताराम मोरे यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूण वनविभागाच्या आवारात वनजीवन विषयावर आधारित छायाचित्र प्रदर्शन
७ ऑक्टोबर : ग्लोबल टुरिझम चिपळूण आणि चिपळूण वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव विषयावर चर्चासत्र
२ ते ८ ऑक्टोबर : जिल्ह्यातील ५० शाळांमध्ये वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने वनसंवर्धनाशी संबंधित प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन
रत्नागिरी (चिपळूण) वनविभागाने आयोजित केलेल्या या विविध कार्यक्रमांचा लाभ घेऊन वन्यजीव संवर्धनाच्या कार्यात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन वनविभागाद्वारे करण्यात येत आहे.




