
स्वरूप योगिनी पुरस्कार श्रद्धा कळंबटे यांना प्रदान
रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या वतीने स्वरूप योगिनी पुरस्काराचे वितरण सामाजिक कार्यकर्त्या सौ. श्रद्धा कळंबटे यांना प्रदान करण्यात आला. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेला व्याख्यात्या प्रा. सौ. अंजली बर्वे यांनी समर्थ शिष्या वेणाबाईंचे चरित्र उलगडताना त्यांनी तत्कालीन समाजाचे चित्रही उभे केले.
मी ठरवून काही केले नाही, पण समोर समाजातील गरजा दिसत गेल्या आणि मी काम करीत गेले. बालसुधारगृहातील मुलांशी संवाद साधावा, झोपडपट्टीमध्ये शिकवावे, स्वच्छता अभियानात प्रत्यक्ष काम करावे, निराधारांची सोय करून द्यावी, समुपदेशन करावे, जे जमेल ते सर्वांच्या सहकार्याने करीत गेले. त्यामुळेच हजारो प्रकरणे सोडवली. आजचा पुरस्कार हा स्वामी स्वरूपानंदांचा प्रसाद आहे, असे भावुक उद्गार सामाजिक कार्यकर्त्या सौ. श्रद्धा कळंबटे यांनी काढले.
स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या वतीने स्वरूप योगिनी पुरस्कार स्वीकारल्यानतंर त्या बोलत होत्या. सेवा मंडळातर्फे वरची आळी येथील अध्यात्म मंदिर येथे स्वरूप योगिनी पुरस्काराचे वितरण झाले. या वेळी सौ. कळंबटे यांना स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष जयंतराव देसाई यांनी स्वरूप योगिनी पुरस्काराने देऊन सन्मानित केले. सन्मानपत्राचे लेखन आणि वाचन राजू जोशी यांनी केले.
सत्काराला उत्तर देताना सौ. श्रद्धा कळंबटे म्हणाल्या की, जे जमेल ते सर्वांच्या सहकार्याने करीत गेले. गरजेप्रमाणे आधार आणि सल्ला देऊन ज्यांना मी मार्गी लावले, अशा प्रकरणांची संख्या आज हजारच्यावर गेली आहे. या कामात मला कुमुदताई रेगे, पेवेंसारखे अनेक स्थानिक डॉक्टर, विनय परांजपे आणि आजही माझ्याबरोबर काम करणार्या अनेक मैत्रिणींची साथ मिळाली. सामाजिक भान मला माझ्या आईने संस्कारातून दिले. निराधार गरजू लोकांना माझ्यापर्यंत आणा, असे आवाहनही त्यांनी केले. त्यांचे हे अनुभव प्रेरक होते.
वेणाबाईंचे चरित्र उलगडले
नवरात्रीच्या पहिल्या तीन माळेतील पहिले व्याख्यान पुष्प प्रा. सौ. अंजली बर्वे यांनी ओवले. समर्थ शिष्या वेणाबाईंचे चरित्र उलगडताना त्यांनी तत्कालीन समाजाचे चित्रही उभे केले. माणुसकीला कलंकित करणार्या दुष्ट रूढींना झुगारून, जननिंदा पचवून भक्ति मार्गावर ठाम उभी राहणारी विधवा वेणा, तिला मठाधिपती करणारे समर्थ आणि ती जबाबदारी समर्थपणे सांभाळणारी कवयित्री वेणा, असा तिचा सर्व जीवन प्रवास अंजली बर्वे यांनी ओघवत्या वाणीने जिवंत केला.
कार्यवाह हृषिकेश पटवर्धन यांनी आभार मानले. स्वामी स्वरूपानंद रचित वरप्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विवेक भावे, श्री. वैद्य यांचेही सहकार्य लाभले.




