
भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी
तरुणांना प्रेरणा देणारी ७५ वर्षीय शेतकऱ्यांच्या श्रमाची ‘नाचणी’
दुर्गम, डोंगर उतारावर, जेथे निराशा आपले तळ ठोकून बसते, तेथेच काही श्रमजीवी हात मातीशी बालपणापासून संवाद साधत आहेत.

चिपळूण तालुक्यातील भैरवगडाच्या पायथ्याशी वसलेल्या तळवडे ग्रामपंचायतीमधील पाते या वाडीत दत्ताराम धामणकर (वय ७५), काशिराम निकम (वय ७५), आणि राजाराम धामणकर (वय ५५) या तिघांची कष्टमय गाथा केवळ शेती नाही, तर अखंड जिद्दीचा मंत्र आहे. काही शेतकरी जेव्हा “आमची शेती दुर्गम आहे, पडीक आहे, आता त्यात काही राहिलं नाही,” अशी निराशेची भाषा बोलून दाखवतात, तेव्हा याच डोंगरउतारावरील या ज्येष्ठ शेतकऱ्यांचे श्रम विशेषतः युवा पिढीला एक तेजस्वी प्रेरणास्रोत ठरतात.
गावचे पोलीस पाटील बळीराम साळुंखे यांच्यासह या शेतीला प्रत्यक्ष भेट देवून त्यांच्या श्रमाची कहानी जाणून घेतली.
श्रमाचा महामंत्र:
या तिन्ही शेतकऱ्यांचे जीवन म्हणजे मातीचे अधिष्ठान आणि घामाचे तीर्थ आहे. ते दररोज या कठीण डोंगर उतारावर चढ-उतार करत, पारंपरिक पद्धतीने नाचणी, वरई (भगर) आणि कुटकी (कांग) यांसारख्या महत्त्वपूर्ण तृणधान्यांचे पीक घेतात. मे महिन्याच्या पहिल्या मशागतीपासून ते तण काढणीपर्यंत (बिवळ) काशिराम निकम अविरत मेहनत घेतात.

दत्ताराम धामणकर – दत्ताराम धामणकर – वयाच्या १२ व्या वर्षापासून शेती करतोय. नाचणी वरई अशा धान्यांचे उत्पादन घेतो. वन्य प्राण्यांच्या वाटणीचे वगळता खंडी दीड खंडी उत्पन्न मला मिळते.

काशिराम निकम – मे पासून शेतीची मशागत सुरु होते. कांग म्हणजे कुटकी, नाचणी यांचे दाणे फेकून रोपे उगवली जातात. त्या रोपांची विरळणी करतो. ही रोपे अन्य ठिकाणी लावली जातात. हरळी काढून शेतातील पाणी काढले जाते. पेरणी, बेणनी, बिवळ म्हणजे तण काढणी अशी शेतकामं करतो. सांबर, डुकरं. माकडं अशा वन्य प्राणांच्या तावडीतून उरलेलं धान्य आमचं.

राजाराम धामणकर – सहकारी शेतकऱ्यांच्या मदतीने आम्ही सर्वच शेती उत्पन्नासाठी मेहनत घेत असतो. नाचणी, वरई, कांग यासारखे उत्पन्न वर्षाला खंडी दीड खंडी या मेहनतीतून मिळते.
सांबर, रान डुकरं, माकडं यांसारख्या वनचरांच्या तावडीतून जे काही उरते, तेच त्यांचे अमूल्य धन. निसर्गाचे आव्हान स्वीकारत आणि निसर्गाशी समेट साधत त्यांची ही शेती सुरू आहे. त्यांच्या या कार्याला सलाम करणे, म्हणजे केवळ कृतज्ञता व्यक्त करणे नव्हे, तर कष्टाच्या संस्कृतीला नमन करणे होय.
कल्पकतेचा साज:

या शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यांपासून पीक वाचवण्यासाठी केलेली युक्ती विलक्षण कल्पकतेची साक्ष देते. रिकाम्या काचेच्या बाटलीला लोखंडी खिळा लावून हवेच्या झोताने आवाज निर्माण करण्याची त्यांची ही अभिनव पद्धत, शून्य खर्चात नैसर्गिक संरक्षण देणारी ठरली आहे.

संपूर्ण जगात २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे झाले. या तृणधान्यांमध्ये ‘श्री अन्न’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाचणीचे महत्त्व अनमोल आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले – शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी – ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, कोदो, कुटकी, सावा ही कमी पाण्यावर, कमी खतावर येणारी तृणधान्य आहेत. नाचणी हे यापैकीच एक महत्वाचे पीक आहे. कॅल्शीयम, फायबर, लोह यातून चांगले मिळते. जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून 4.35 मेट्रीक टन नाचणी बियाणे शेतकऱ्यांना वितरीत केले आहे. यामधून 1600 हेक्टर क्षेत्र जिल्ह्यात लागवडीखाली आले आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशन अंतर्गत 720 हेक्टर कार्यक्रमाखाली 3.6 मेट्रीक टन नाचणीचे बियाणे दिली आहेत. शेतकरी बंधुनो पौष्टीक सकस आहारासाठी नाचणी लागवड करावी.
शत्रुघ्न म्हेत्रे, तालुका कृषी अधिकारी – भैरवगडाच्या पायथ्याला हे शेतकरी डोंगर उतारावर पिढ्यान-पिढ्या चांगले उत्पन्न घेत आहेत. या सर्वांचे कष्ट त्यांची मेहनत ही इतरांना प्रेरणा देणारी आहे. शेतकऱ्यांनी नाचणीची लागवड करावी.
ए. वाय. जाधव, उपकृषी अधिकारी – शेतकऱ्यांचे गट करुन दुर्गम भागात नाचणी उत्पन्न घेण्यासाठी गटशेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले. 2 टन एरिया भरेल असे प्रात्याक्षिक घेतले होते. वन्यप्राण्यांपासून संरक्षण करणारी कल्पकत्ता देखील कौतुक करणारी आहे.
🌾 नाचणी – नाचणीला श्री अन्न म्हणून ओळखले जाते. 100 ग्रॅम नाचणीमध्ये प्रथिने 7.30 टक्के, पिष्टमय पदार्थ 1.30 टक्के, स्निग्ध पदार्थ 3.60 टक्के, तंतूमय पदार्थ 3.90 टक्के, लोह 2.70 टक्के , 344 मि.ग्रॅम. कॅल्शीयम, 283 मि.ग्रॅ.फॉस्फरस आढळून येतात.
नाचणीचे पदार्थ खल्ल्याने कोलेस्ट्रोलचे प्रमाण कमी होते. लहान मुलांची हाडे बळकट होतात. लहान मुले, गर्भवती महिला, वयस्कर व्यक्तींना नाचणीचे पदार्थ अतिशय उपयुक्त ठरतात.
🌾 नाचणीचे पदार्थ – डोसा, लाडू, पापड, भाकरी, बिस्कीटे, अपे, लाफ्सी, सत्व, मोदक, चकली, शेव, बर्फी, वडी, केक, वडे, पोहे, कुरकुरे, नुडल्स आदी पदार्थांमधून नाचणी आपल्या ताटातील आहारात स्थान मिळवते.
हा लेख केवळ तीन शेतकऱ्यांची माहिती नाही, तर डोंगरावरील मातीला आपले मानणाऱ्या, निसर्गाच्या संघर्षातून सोनं पिकवणाऱ्या त्या श्रमाची कथा आहे. अन्य शेतकऱ्यांनी देखील कृषी विभागाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा. आरोग्य आणि समृद्धीच्या या मार्गावर अग्रक्रम घेवून नाचणी लागवड करावी.
– प्रशांत कुसुम आंनदराव सातपुते जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी




