रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी बाबुराव जोशी, मालतीबाई जोशी पुरस्कार

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कै. बाबुराव जोशी आदर्श शिक्षक पुरस्कार रा.भा. शिर्के प्रशालेतील शिक्षिका सौ. स्नेहा साखळकर, कै. मालतीबाई जोशी आदर्श कर्मचारी पुरस्कार जी.जी.पी.एस. विद्यालयाचे लिपिक गजानन लोंढे आणि कै. मालतीबाई जोशी आदर्श सेवक पुरस्कार कीर विधी महाविद्यालयातील सेवक सुरेश बेर्डे यांना प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ व रोख पाच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कै. बाबुराव जोशी यांच्या जयंतीनिमित्त शिर्के प्रशालेच्या सौ.विजयालक्ष्मी मलुष्टे रंजन मंदिर सभागृहात हा सोहळा झाला. याप्रसंगी र.ए. सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. मुकुंदराव जोशी, कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, आजीव सभासद मंडळाचे सदस्य डॉ. संजय केतकर, आनंद देसाई, मनोज पाटणकर विजयराव देसाई, सचिन वहाळकर, शिर्के प्रशालेचे मुख्याध्यापक कुमारमंगलम कांबळे उपस्थित होते.

सुरवातीला शिर्के प्रशालेतील विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. दीप प्रज्वलन करण्यात आले. संस्थेचे कार्यवाह सतीश शेवडे यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सतीश शेवडे यांनी प्रास्ताविकात र.ए. सोसायटीच्या सर्व शैक्षणिक संस्थांच्या कार्याचा आढावा घेतला. सर्व देणगीदार व माजी विद्यार्थी यांचे आभार मानले. संस्थेचे सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर यांनी कै. बाबुराव जोशी आदर्श शिक्षक पुरस्कार व कै.मालतीबाई जोशी आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराची घोषणा केली.

र.ए.सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन यांनी आपल्या मनोगतात कै.बाबुराव जोशी व कै.मालतीबाई जोशी यांचे संस्था उभारणीतील योगदान अधोरेखित केले. आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी कौशल्य विकास पूरक अभ्यासक्रम, रिसर्च सेंटर उभारणी, पॅरामेडिकल अभ्यासक्रम संस्था सुरू करणार आहे असे यावेळी त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात संस्थेचे उपाध्यक्ष व कै.बाबुराव जोशी यांचे नातू डॉ. मुकुंदराव जोशी यांनी कै.बाबुराव जोशी व कै.मालतीबाई जोशी यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला. कै.बाबुराव जोशी यांनी केलेल्या उल्लेखनीय सामाजिक व शैक्षणिक कामाचा विचार करता त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले जावे ही आपली व कुटुंबाची इच्छा आहे. यासाठी संस्थेने सहकार्य करावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

सूत्रसंचालन प्रा. वैभव कानिटकर यांनी केले. रा. भा.शिर्के प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.कुमारमंगलम कांबळे यांनी कै.बाबुराव जोशी व कै.मालतीबाई जोशी यांना अभिवादन करून सर्व उपस्थितांचे व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button