मंत्री गुलाबराव पाटील यांचा खास, माजी महापौरच्या फॉर्म हाऊसवर बनावट कॉल सेंटर, पोलिसांकडून पर्दाफाश.

जळगावात ममुराबाद रोडवर शिवसेनेचे माजी महापौर ललित कोल्हे यांच्या फॉर्म हाऊस येथील इमारतीमध्ये सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह एकूण 8 जणांना ताब्यात घेतले असून अटकेची कारवाई सुरू आहे. कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशी लोकांना संपर्क साधून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना ऑनलाईन पद्धतीने फसविले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शिवसेना शिंदे गटात असलेल्या माजी महापौर ललित कोल्हे यांच्या मालकीचा हा फॉर्म हाऊस आहे. तेच हे कॉल सेंटर चालवत असल्याचा पोलिसांना संशय असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

कोलकाता आणि वेगवेगळ्या राज्यातील तरुण या ठिकाणी पगारावर काम करत आहेत. त्यांच्या माध्यमातून वेगळ्या ऑनलाईन कंपनीचे नावे सांगून फसवणूक केली जात असल्याचा समोर आला. 20 दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या या कॉल सेंटरच्या माध्यमातून अनेक विदेशी नागरिकांची लाखो रुपयांत फसवणूक झाल्याची शक्यता असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या प्रकरणात जळगाव शहरातील तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.

पोलीस काय म्हणाले?
अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली. “आम्हाला काल संध्याकाळी माहिती मिळाली होती की, जळगाव शहरापासून तीन-चार किमी अंतरावर ममूराबाद रोडवर एक फॉर्महाऊस आहे. एल. के. नावाचं ते फॉर्म हाऊस आहे. त्या ठिकाणी बोगस कॉल सेंटर आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे एजंट असून परदेशी नागरिकांना फसवलं जात असल्याची माहिती मिळाली होती. रात्रीच्या वेळी हे कॉलिंग करतात. या माहितीच्या आधारावर आम्ही अधिकाऱ्यांचं पथक तयार केलं. या पथकाने आज दुपारी एक वाजता फॉर्म हाऊसवर छापा टाकला. यावेळी आपल्याला मिळाली बातमी खरी असल्याचं आढळलं”, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिली.
“आम्ही खातरजमा केली तेव्हा त्या ठिकाणी 31 लॅपटॉप मिळाली. पूर्ण एका हॉलमध्ये कॉल सेंटरचं त्याला रुप दिलेलं आहे. छापा टाकला तेव्हा 2 सिस्टिम ओपन मिळाल्या. त्यातून रात्रीच्या वेळेला परदेशी कॉल झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. वेगवेगळ्या कंपनीचे एजंट असल्याचं बतावणी करुन परदेशी नागरिकांकडून पैसे ट्रान्सफर करुन घेतल्याचं उघडकीस आलं आहे. बाकीचे सिस्टिम बंद असल्याने त्याची माहिती मिळाली नाही. पण सर्व लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत”, असं अशोक नखाते यांनी सांगितलं.

“आम्हाला घटनास्थळी 4 संशयित सापडले आहेत. त्यांची प्रथमदर्शीनी चौकशी केली असता ते कोलकाताचे आहेत, अशी माहिती समोर येत आहे. त्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी केली असता या बनावट कॉल सेंटरमध्ये साधारणत: 20 ते 25 जण काम करतात. संबंधित ठिकाणी 9 तारखेनंतर सेटअप झाल्याचं त्यांनी सांगितलं. आम्ही याबाबत सविस्तर माहिती मिळवत आहोत. हॅण्डलर हे मुंबईतील हॅण्डल करत होते. या प्रकरणातील पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे”, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button