
रत्नागिरी रेल्वे स्थानका सह अन्य स्थानकांचे नाव येत्या आठ दिवसांत मराठीत लिहा अन्यथा काळे फासणार-खासदार अरविंद सावंत
कोकण रेल्वेच्या महत्त्वाच्या रत्नागिरी स्थानकावर केवळ इंग्रजी भाषेतील फलकांचा वापर करून मराठी भाषेचा घोर अपमान करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार खासदार अरविंद सावंत यांच्या भेटीत उघड झाला आहे. स्थानकातील मुख्य स्वागत फलकापासून ते प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या सर्व दरवाज्यांवरील नामफलक केवळ इंग्रजीत पाहून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते असलेल्या सावंत यांचा पारा चढला आणि त्यांनी रेल्वे प्रशासनाला थेट ‘काळे फासण्याचा’ इशारा दिला आहे.
‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याचा डौल मिरवणाऱ्या राज्यातील बड्या नेत्यांच्या राज्यात मराठीचा अपमान होत असताना त्यांना काहीच वाटत नाही, हे आश्चर्यकारक आहे,’ अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवरही जोरदार टीकास्त्र सोडले. सावंत यांनी रेल्वे प्रशासनाला तत्काळ उपाययोजना करण्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली आहे. ‘आज नजरेस आलेले हे सर्व फलक आठ दिवसांत मराठीत स्थापित न झाल्यास, मी स्वतः येऊन या इंग्रजी फलकांना काळे फासेन,’ असा थेट आणि सणसणीत इशारा त्यांनी दिला आहे.
केवळ नामफलकांचाच मुद्दा नाही, तर कोकण रेल्वेच्या ढिसाळ आणि प्रवाशांकडे दुर्लक्ष करणाऱ्या कारभारावरही सावंत यांनी कडक टीका केली आहे. ‘कोकण रेल्वेचे दुपदरीकरण करा’ किंवा ‘गाड्या वाढवा’ यांसारख्या मागण्यांवर रेल्वे मंत्री नेहमी ‘दुर्गम भाग आहे, खर्चिक बाब आहे,’ अशी पळवाट काढत राहतात. विशेष म्हणजे, राज्यातील एक मंत्री याच रत्नागिरीतून निवडून आले असूनही त्यांना या परिस्थितीची कसलीही चिंता नसल्याचे दिसत आहे. आजही कोकण रेल्वेच्या प्रवाशांवर अवाजवी अधिक भाड्याचा भार लादला जात असल्याची तक्रार त्यांनी केली.
रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, पण या दिखाऊ सुशोभीकरणाचा प्रवाशांना काय उपयोग, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याचे उदाहरण देताना ते म्हणाले, ‘कणकवली स्टेशनचा परिसर असाच कोट्यवधी रुपये खर्च करून सुशोभित केला गेला, पण स्टेशनवर प्रवाशांसाठी छप्पर (शेड) नाही. त्यामुळे प्रवाशांना स्वतःच्या सामानासोबत छत्री घेऊन उभे राहावे लागते किंवा तळपत्या उन्हात तडपडावे लागते.’ हीच विदारक परिस्थिती रत्नागिरीसह कोकणातील सर्व रेल्वे स्थानकांवर असल्याचे खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट केले. मराठीचा अपमान आणि प्रवाशांची गैरसोय त्वरित दूर न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.




