
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिलारीतील कार जळीत प्रकरण: दोडामार्ग नगराध्यक्षांसह चार जणांना पाच दिवसांची कोठडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोमांस वाहतूक करीत असल्याच्या संशयावरून तिलारी येथे स्विफ्ट कार पेटवून दिल्याच्या प्रकरणात सुमारे ५० ते ६० जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गैरकायदेशीर जमाव करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, तसेच लोकसेवकाला त्याचे कायदेशीर काम करण्यापासून परावृत्त केल्याची फिर्याद पोलिस परशुराम गंगाराम सावंत यांनी दिली.त्यानुसार संशयित आरोपी दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस, महिंद्र खरवत, विजय कांबळे या चार जणांना अटक करून शुक्रवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस ठाण्यातून देण्यात आली.
पोलिस परशुराम गंगाराम सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी निजामुद्दीन मोहम्मद कुरेशी हा त्याचे ताब्यातील मोटर कार क्रमांक जीए ०६ एफ ४५०७ या वाहनामध्ये मांसाची वाहतूक करीत असल्याचे वीजगरचे पोस्ट येथे समक्ष मिळून आला. त्याची माहिती आपल्या वरिष्ठांना देण्यात आली. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार संबंधित चालकाची खातरजमा करून पुढील कायदेशीर कारवाई करण्याकरिता दोडामार्ग पोलिस ठाणे येथे घेऊन जात होतो. दरम्यान आम्ही १२:३० वाजण्याच्या सुमारास दोडामार्ग बेळगाव रोडवर पाताळेश्वर मंदिराजवळ आलो असता सुमारे ५० ते ६० लोकांनी चारचाकी व दुचाकी वाहनाने आमचा रस्ता अडविला व जबरदस्तीने आम्हाला थांबून गाडीच्या सगळ्या काचा दगडाने व लाकडी दांड्याने फोडल्या. तसेच आरोपींनी गाडीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले.
निजामुद्दीन मोहम्मद सय्यद कुरेशी याची ताब्यातील मोटर कार क्रमांक जीए ०६ एफ ४५०७ या वाहनातून गोमांस घेऊन जात असल्याची अफवा पसरून घटना घडवून आणली. तसेच, फिर्यादी शासकीय गणवेशात असताना आणि फिर्यादी शासकीय कर्तव्य बजावत आहेत, हे माहीत असूनदेखील संबंधित संशयित आरोपींनी असले कृत्य केल्याची फिर्यादी यांनी कायदेशीर तक्रार दिलेली आहे.




