
रत्नागिरीच्या क्षत्रिय मराठा मंडळाचा रविवारी १८ वा वर्धापनदिन
रत्नागिरी : क्षत्रिय मराठा मंडळ, रत्नागिरी या मंडळाचा अठरावा वर्धापनदिन सोहळा उद्या (२८ सप्टेंबर) सायंकाळी ५.३० वाजल्यापासून टीआरपी येथील अंबर हॉल येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या प्रसंगी कुलस्वामिनी माता श्री तुळजाभवानीची पूजा, स्वागतगीत, मान्यवर व्यक्ती आणि गुणवंताचे सत्कार आयोजित करण्यात आले आहेत.
वर्धापनदिन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून बिझिनेस काऊन्सेलर व अर्थसंकेतचे संपादक डॉ. अमित बागवे उपस्थित राहणार आहेत. तरूण पिढी, उद्योग व्यवसाय आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यावर ते मार्गदर्शन करणार आहेत. सोहळ्यात गुणवंतांचा सत्कार, सांस्कृतिक व मनोरंजनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील क्षत्रिय मराठा मंडळाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात पार पडणार आहे.
या कार्यक्रमात रत्नागिरी तालुक्यातील मराठा समाजातील ७५ वर्षे व ९० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरीकांचा सत्कार करण्यात येणार आहे. सीईटी, नीट, जेईई या परीक्षेमधील गुणवंत, पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी, इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्तीधारक आणि एनएमएमएस परीक्षेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, राष्ट्रीय पातळीवर यशस्वी, कला, क्रीडा, सामाजिक क्षेत्रातील विशेष प्राविण्य मिळविलेल्या व्यक्तींचे सत्कार करण्यात येणार आहेत.
सांस्कृतिक मेजवानीत गायन, नृत्याच्या बहारदार कार्यक्रम, हास्य आणि मनोरंजनाचा गमतीशीर खेळ रंगणार असून लकी ड्रॉमधील विजेत्यांना आकर्षक बक्षीस जिंकता येणार आहे. उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. हा सोहळा सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यशस्वी करावा, असे आवाहन अध्यक्ष सुरेशराव सुर्वे यांनी केले आहे.




