जागतिक रेबीज दिनानिमित्त जिल्ह्यात रेबीज आजार जनजागृती सप्ताहाचे आयोजन

रत्नागिरी : दरवर्षी २८ सप्टेंबर हा दिवस जागतिक रेबीज जनजागृती दिन म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने आरोग्य विभागामार्फत रत्नागिरी जिल्ह्यात २२ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर दरम्यान रेबीज आजार जनजागृती सप्ताह साजरा केला जात आहे.

रेबीज हा एक अत्यंत धोकादायक आणि प्राणघातक आजार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, जगभरात दरवर्षी हजारो लोक या आजारामुळे मृत्यूमुखी पडतात. प्रामुख्याने कुत्रे आणि इतर संक्रमित प्राणी यांच्या चावण्यामुळे रेबीजचा प्रसार होतो.

रेबीज म्हणजे काय?
रेबीज हा हायड्रोफोबिया (Hydrophobia) नावाचा विषाणूजन्य आजार आहे. याचा प्रसार संक्रमित प्राणी (कुत्रा, मांजर, कोल्हा, वटवाघूळ इ.सारख्या) यांच्या चावण्याने, ओरखड्याने किंवा लाळेद्वारे होतो. हा आजार एकदा झाल्यानंतर त्यावर कोणताही उपचार उपलब्ध नाही आणि मृत्यू अटळ ठरतो.

लक्षणे:
रेबीजची लक्षणे दोन प्रकारांत दिसतात:

1)आक्रमक प्रकार (Furious form):
-कुत्र्याचा स्वभाव अचानक चंचल व आक्रमक होतो.
-सतत भुंकणे किंवा गुरगुरणे.
-पाणी पाहिल्यावर भीती वाटणे व पिण्यास नकार देणे.
-तोंडातून सतत फेस येणे.
-अचानक झटके येणे.

2) मूक प्रकार (Dumb form):
-कुत्रा शांत व सुस्त पडतो.
-हालचाल कमी होते.
-गिळताना त्रास होतो.
-हळूहळू पक्षाघात (Paralysis) होतो.

रेबीजपासून बचाव :
-सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुत्रा चावल्यास किंवा ओरखडा बसल्यास लगेच जखम साबणाने स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी. – जखमेला इतर घटक पदार्थ लावू नयेत
-तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन रेबीज प्रतिबंधक लस तात्काळ घ्यावी.
-घरातील व आजूबाजूच्या पाळीव प्राण्यांना नियमित लसीकरण करावे.
-रस्त्यावरच्या किंवा संशयास्पद प्राण्यांपासून सावध राहावे.
-लसीच्या वेळपत्रकाचे तंतोतंत पालन करावे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे श्वान दंशावरील रेबीज लस साठा पुरेश्या प्रमाणात उपलब्ध असून ही लस पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे. रेबीज हा १०० टक्के टाळता येण्याजोगा आजार आहे. वेळेत लस घेतल्यास आणि योग्य ती काळजी घेतल्यास या आजारापासून स्वतःचे आणि समाजाचे रक्षण करता येऊ शकते.तरी श्वानदंशा सारख्या घटना घडल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन वेळेत लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button