अतिवृष्टीमुळे औद्योगिक वसाहतीस संलग्न गावे व शेतीला अपाय होणार नाही याची दक्षता घ्या-उद्योग मंत्री उदय सामंत


छत्रपती संभाजीनगर, – अतिवृष्टिमुळे औद्योगिक वसाहतीच्या संलग्न भागात गावात, शेतात पाणी शिरल्याचे प्रकार घडले. ते भविष्यात घडू नये यासाठी तात्काळ उपाययोजना राबवा. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी सविस्तर प्रस्ताव सादर करा,असे निर्देश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिले.
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील औद्योगिक क्षेत्रात व औद्योगिक क्षेत्रामुळे संलग्न भागात पाणी जाऊन झालेल्या नुकसानीचा आढावा आज उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.

आ. विलास भुमरे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्यअभियंता ब्ळासाहे झांजे, कार्यकारी अभियंता छत्रपती संभाजीनगरआर.डी.गिरी, लातूर अभय नवधने, जालना बाळू राऊतराय, धाराशिव प्रमोद मगरे, रविंद्र चौधरी, ऑरिक सिटीचे अरुणकुमार दुबे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक छत्रपती संभाजीनगर स्वप्निल राठोड, जालना योगेश सारणेकर, बीड किरण जाधव, तसेच उद्योग संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे औद्योगिक वसाहतीत निर्माण झालेल्या समस्या, तसेच औद्योगिक वसाहतीतील पाणी संलग्न भागात जाऊन गावांचे व शेतीचे झालेले नुकसान याबाबत आढावा घेण्यात आला. अशा समस्या पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचे निर्देश मंत्री सामंत यांनी दिले. त्यात कामगार चौक ते आंबेडकर चौक या रस्त्यासाठी १६ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच रांजणगाव शेणपुंजी येथे ६०० मिटर रस्ता खराब असून त्याबाबत ग्रामस्थांची मागणी आहे. ही समस्या तात्काळ निकाली काढावी असे निर्देश श्री. सामंत यांनी दिले तसेच वाळूज एमआयडीसीतील साजापूर रस्त्यालाही मंजूरी देण्यात आली. औद्योगिक वसाहतीतून संलग्न भागात जाणारे पावसाचे पाणी तात्काळ वळविण्याचे निर्देशही देण्यात आले. औद्योगिक वसाहतींचा काही ठिकाणी खंडीत झालेला वीज पुरवठा पुर्ववत सुरु झाल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. वाळूज एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन बदलणे आवश्यक असुन त्यासाठी सिडको सोबत हे काम करण्यात यावे असे निर्देश देण्यात आले. तसेच टाटा संस्थेच्या सहयोगातून ७००० विद्यार्थी शिकू शकतील असे कौशल्य विकास केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे सुरु करण्याबाबतही उद्योग विभाग प्रयत्नशील असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button