
गणपतीपुळे येथे आर्थिक समावेशन मोहिमेअंतर्गत शिबीर
रत्नागिरी, दि. २४ ):- भारत सरकारच्या वित्त मंत्रालय वित्तीय सेवा विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील तळागाळातील प्रत्येक व्यक्तीला शासकीय योजनांचा लाभ मिळावा या उद्देशाने १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने जिल्हा अग्रणी बँक रत्नागिरी – बँक ऑफ इंडिया तर्फे गणपतीपुळे ग्रामपंचायत हद्दीतील दर्या सारंग पॅलेस येथे आर्थिक समावेशन योजनांबाबत जनजागृती मोहिमेतंर्गत शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेचे महाप्रबंधक अमित सिन्हा, बँक ऑफ इंडियाचे आंचलिक प्रबंधक नरेंद्र देवरे, बँक ऑफ महाराष्ट्रचे आंचलिक प्रबंधक सागर नाईक, रिझर्व्ह बँकेचे प्रबंधक विजय कोरडे, जिल्हा विकास व्यवस्थापक नाबार्ड महेश टिळेकर, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे, भारतीय स्टेट बँकचे मुख्यप्रबंधक सतीश गोटल, बँक ऑफ इंडिया गणपतीपुळे शाखा व्यवस्थापक प्रथमेश सरमळकर, मालगुंड ग्रामपंचायतीच्या सरपंच श्वेता खेऊर आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिराला भारतीय रिझर्व्ह बँकेचे महाप्रबंधक श्री. सिन्हा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन केले. तसेच री-केवायसीची आवश्यकता आणि डिजिटल फसवणूक टाळण्याचे उपाय आणि “डिजिटल अरेस्ट” या महत्त्वाच्या विषयावर माहिती दिली.
बँक ऑफ इंडियाचे आंचलिक प्रबंधक श्री. देवरे यांनी प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना या योजनांची माहिती दिली. निष्क्रिय ठेवी टाळण्यासाठी रिकेवायसी आणि खात्याला वारस आवश्यकतेबाबत मार्गदर्शन पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे केले. यावेळी प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेअंतर्गत लाभार्थ्यास बँक ऑफ इंडियाद्वारे २ लाख रुपयांचा दावा धनादेश प्रदान करण्यात आला. शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावातील बहुसंख्य नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी सर्व बँकांच्या बँक प्रतिनिधींनी प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत खाते उघडणीसह विविध योजनांमध्ये नावनोंदणी केली.
शिबिराचे यशस्वी आयोजन प्रबंधक (वित्तीय समावेशन) विजय पाटील, वरिष्ठ प्रबंधक (कृषि) संकेत सकपाळ, वरिष्ठ प्रबंधक (राजभाषा) रमेश गायकवाड, मुख्यप्रबंधक मुकेश मेश्राम तसेच बँक ऑफ इंडिया टीमने केले. या शिबिरामुळे स्थानिक लोकांना विविध वित्तीय योजना आणि सेवा समजून घेण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ प्रबंधक संकेत सकपाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे यांनी केले.




