भरजरी शालू नेसवलेले काँग्रेसचे मामा पगारे मानसिक धक्क्याने रुग्णालयात दाखल; भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली!

कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साडीच्या वेशातील प्रतिमा समाज माध्यमांत प्रसारित केल्यामुळे डोंबिवलीतील काँग्रेसचे ७२ वर्षाचे ज्येष्ठ नेते मामा पगारे यांना भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भर रस्त्यात गाठून त्यांच्या स्वच्छ पांढऱ्या शुभ्र सदरा, विजारीवर नवा कोरा शालू नेसवला. या सगळ्या प्रकाराने मानसिक धक्का बसलेले मामा पगारे पोलीस कार्यालयात तक्रार दाखल करण्यासाठी जात असताना मानसिक धक्क्याने जमिनीवर कोसळले. त्यांना तात्काळ कल्याण मधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे काँग्रेसचे कल्याण जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांनी सांगितले.

या सगळ्या प्रकाराने भाजपची दडपशाही, हुकुमशाही वृत्ती दिसून येते. मामा पगारे यांच्या सारख्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्याला भर रस्त्यात गाठून त्यांना साडी नेसविण्यात आली. हा प्रकार कुणालाही पटला नाही. एवढी साडीची भीती भाजप नेत्यांंना वाटते तर त्यांनी तसे वागू नये, अशी टीका कल्याण जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केली.

मामा पगारे यांंच्या सोबत गैरवर्तन केलेल्या भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि इतर सहकारी यांना दुर्गा मातेने चांगले आचरण करण्याची सुबुध्दी देवो, यासाठी काँग्रेसचे कल्याणमधील पदाधिकारी सचिन पोटे, ब्रिज दत्त, महिला संघटक कांचन कुलकर्णी आणि इतरांनी दुर्गाडी किल्ला येथे नवरात्रोत्सवानिमित्त जाऊन दुर्गाडी देवीला साडी अर्पण केली. आणि भाजप पदाधिकाऱ्यांना सुबुध्दी देण्याची मागणी देवीकडे केली.

मामा पगारे यांना भाजप पदाधिकाऱ्यांनी शालू नेसविल्याचा प्रकार घडल्यानंतर काँग्रेस निष्ठ मामा पगारे कल्याण येथे पोलीस उपायुक्त कार्यालयात भाजप पदाधिकाऱ्यांविरुध्द तक्रार दाखल घेण्यासाठी सहकाऱ्यांसोबत गेले होते. कार्यालयात पोहचण्यापूर्वीच मामा पगारे यांना बाहेर भोवळ आली आणि ते जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने कल्याण मधील एका खासगी रुग्णालयात सहकाऱ्यांनी दाखल केले. तेथे त्यांच्यावर तीन दिवसांपासून उपचार सुरू आहेत.

दरम्यान, गुरुवारी सकाळी कल्याण जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पदाधिकारी नवेंन्दू पाठारे आणि इतर सहकारी यांनी डोंबिवलीतील टिळकनगर पोलीस ठाण्यात जाऊन मामा पगारे यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांंविरुध्द तक्रार केली. या प्रकरणातील भाजप पदाधिकाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडे केली. या शालू प्रकरणामुळे भाजप आणि काँग्रेसमधील वातावरण तापले आहे.

‘आमच्या आदरणीय नेत्याची बदनामी केली तर आम्ही ती सहन करणार नाही. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यांना, चौकशीला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार आहोत,’ असे भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी सांगितले. पालिका निवडणूक काळात हे साडी प्रकरण अधिकच पेटण्याची चिन्हे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button