
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा गुहागर तालुका प्रेस क्लबकडून निषेध
त्र्यंबकेश्वर येथे टोल वसुली करणाऱ्या गुंडांकडून पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा गुहागर तालुका प्रेस क्लब या संघटनेने तातडीने बैठक घेऊन निषेध केला आहे. या बैठकीला संघटनेचे सर्व प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी हल्लेखोरांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी करून जाहीर निषेध करण्यात आला.
त्र्यंबकेश्वर येथे साधू महंताची कुंभमेळ्याच्या संदर्भात बैठक होती. त्या बैठकीचे वृत्तांकन करण्यासाठी काही पत्रकार नाशिक येथून त्र्यंबकेश्वर गेले होते. त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रवेश शुल्क भरावे लागते; मात्र आम्ही पत्रकार आहोत आणि बातमी कव्हर करण्यासाठी आलो आहोत, असे वारंवार सांगूनही टोलवरील कर्मचारी ऐकायला तयार नव्हते. पत्रकार वरिष्ठांना फोन करीत असतानाच वसुली करणाऱ्या गुंडांनी पत्रकारांना मारहाण करायला सुरूवात केली. यामध्ये झी – २४ तासचे योगेश खरे, पुढारी न्यूजचे किरण ताजणे, अभिजित सोनवणे आणि अन्य दोन पत्रकार जखमी झाले असून एका पत्रकारावर त्र्यंबकेश्वर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जिल्हाधिकारी यांनी पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असले, तरी पुर्वानुभ बघता काही कारवाई होण्याची शक्यता नसल्याने मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून हल्लेखोरांना अद्दल घडेल अशी कारवाई करावी, अशी मागणी देखील केली आहे. हल्लेखोरांवर कारवाई झाली नाही, तर पत्रकार रस्त्यावर उतरतील असा इशारा गुहागर तालुका प्रेस क्लब अध्यक्ष दिनेश चव्हाण व सर्व सभासदांनी दिला आहे.
महाराष्ट्रात २०१९ मध्ये पत्रकार संरक्षण कायदा झाला. मात्र सात वर्षे झाली तरीही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ले पुन्हा वाढले आहेत. पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीचे नोटिफिकेशन काढून सरकारने तातडीने महाराष्ट्रात हा कायदा लागू करावा अशी मागणीही केली आहे.



